शैक्षणिक भेट : पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे विज्ञान महाविद्यालयाची नागपूर भेट पांढरकवडा : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’चा अंक अगदी भल्या पहाटे प्रत्येकाच्या घरी कसा पोहोचतो, याची उत्सुकता घेऊन ‘लोकमत’च्या मुद्रणालयात पोहोचलेले विद्यार्थी थक्क झाले. अवघ्या काही तासात हजारो अंकांची होणारी छपाई आणि त्यामागील तंत्रज्ञान पाहून विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुटीबोरी येथील ‘लोकमत’च्या स्टेट आॅफ आर्ट मुद्रणालयाला दिलेल्या शैक्षणिक भेटीचे. नागपूरच्या बुटीबोरी येथे ‘लोकमत’चे अत्याधुनिक मुद्रणालय आहे. या मुद्रणालयाचे तंत्रज्ञान शैक्षणिक जीवनात माहीत व्हावे म्हणून विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी येथे नेहमीच भेट देत असतात. सोमवारी पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे विज्ञान महाविद्यालयाच्या बीएस्सी भाग -२ व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वृत्त संकलनापासून ते छपाईपर्यंतचे वृत्तपत्राचे अंतरंग समजून घेतले. अद्यावत छपाई तंत्रज्ञानाने ‘लोकमत’चा अंक कसा छापला जातो हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघितले. त्यामागील तंत्रज्ञानही समजून घेतले. सौरऊर्जेवर ‘लोकमत’ वृत्तपत्राची छपाई केली जाते. त्या सोलर जनरेशन प्लॅन्टलाही भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले. या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’चे संचालक रमेश बोरा, निर्मिती विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक राजेंद्र पिल्लेवार, भूषण चंदनखेडे यांनी प्रत्येक बारकावे समजावून सांगितले. प्राचार्य डॉ. एस.आर. वऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात या शैक्षणिक भेट प्रसंगी प्रा.डॉ. सुनील चवरे, प्रा.डॉ. विजय वातिले, प्रा.डॉ. सुजाता शेंडे, प्रा.डॉ. अमर वंजारे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्टेच्यू आॅफ फ्रिडम आॅफ प्रेस’ला भेट देऊन छायाचित्रही काढले. (तालुका प्रतिनिधी)
‘लोकमत’चे मुद्रण तंत्रज्ञान पाहून विद्यार्थी भारावले
By admin | Updated: October 4, 2016 02:13 IST