किशोर तिवारी : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन; अधिकाऱ्यांनो, राजकीय दबावाला बळी पडू नका !पुसद : मला वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचा अध्यक्ष केले. याचा अर्थ माझा संघर्ष काही कमी होणार नाही. एक आंदोलक म्हणून हा मिशनचा झेंडा हाती घेतला आहे. गरिबांसाठी देवाणं पाठविलेला माणूस म्हणून माझी भूमिका राहणार आहे, असे वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर किशोर तिवारी प्रथमच पुसदमध्ये आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी या मिशनचा उद्देश स्पष्ट केला. राज्यातील १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना अंत्योदय अंतर्गत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचा लाभ ५० हजार शेतकऱ्यांंना मिळणार आहे, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. अंत्योदयच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांपर्यंत शासनाची योजना पोहोचवावी, त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपली पूर्वी सारखीच भूमिका ताठर राहील काय, असे विचारले असता तिवारी म्हणाले, काँग्रेसची सत्ता १५ वर्ष होती. काँग्रेसला आम्ही सहकार्य केले. परंतु त्यांनी आम्हाला सहकार्यच केले नाही. नंतर भाजपाला निवडणुकीत पूर्ण सहकार्य केले. भाजपानेही १५ वर्ष संघर्ष केला. या संघर्षातूनच आम्ही त्यांची साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी आग्रह केल्यानेच स्वावलंबन मिशनचा अध्यक्ष झालो. शेतकरी आत्महत्यासंदर्भात किंवा इतरही समस्यांविषयी सरकार सोबत सहकार्य राहील. वेळप्रसंगी ताठर भूमिका घेऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यात कोणताही शेतकरी अन्नावाचून राहू नये यासाठी शासनाने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकरी व शेतमजुरांना बीपीएल योजनेतून राशन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलजावणी सुरू झाली आहे. पत्रपरिषदेपूर्वी किशोर तिवारी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकरी आत्महत्या व त्यांच्या प्रश्नांची सांगड कशी घालावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये असा सल्ला देत आपल्याशी दूरध्वनीवरून कधीही संपर्क साधू शकता, असे ते म्हणाले. बैठकीला उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, तहसीलदार भगवान कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष कमी होणार नाही
By admin | Updated: August 31, 2015 02:19 IST