ग्रामसभा घेतली : गावातील पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याचे निर्देशयवतमाळ : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतेच यवतमाळ तालुक्यातील किटा या गावाला भेट देऊन गावात मुक्कात केला. या मुक्कामात त्यांनी गावकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधत गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी ग्रामसभा घेऊन विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. या मुक्कामात डॉ.कलशेट्टी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश शिर्के हे सुद्धा उपस्थित होते. किटा येथे मुक्कामी गेल्यानंतर रात्री आठ वाजता गावात ज्या नागरिकांकडे शौचालय नाही अशा नागरिकांची त्यांनी ग्रामसभा घेतली. नागरिकांशी व्यक्तिश: संवाद साधत प्रत्येकाने शौचालय बांधून गाव १०० टक्के हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले. या गावात बळीराजा चेतना अभियान व पाणलोट समितीमार्फत गावकऱ्यांच्या जनजागृतीसाठी मुक्कामाच्या दरम्यान कलापथकाचे कार्यक्रमही सादर करण्यात आले. पाणी व स्वच्छता या विषयावर चर्चा करण्यासोबतच किटा या गावात विकेंद्रीकरण पध्दतीने प्रत्येकास सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नरेगा विहीरी व शेततळ्यांचा आढावाही त्यांनी घेतला व आवश्यक ते नियोजन करण्यात आले. गावात ७२ कुटुंबांकडे शौचालय नसून या शौचालयाच्या बांधकामाचे नियोजनही यावेळी करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन शौचालय व घरकुलाची पाहणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता घरकूल लाभार्थ्यांशी चर्चा केली. गावातील बांधकामाधीन व मंजूर घरकुले १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच गावकऱ्यांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर डॉ.कलशेट्टी यांनी सिंचन प्रकल्पांतर्गत नालाडोह व शेततळ्याचीही पाहणी केली.यावेळी गटविकास अधिकारी मानकर, पंचायत विस्तार अधिकारी खाडे, आरोग्य विस्तार अधिकारी सिसले, देऊळकर, किटाचे सरपंच इंद्रपाल डहाणे, उपसरपंच पोलू किरतकार, ग्रामसेवक इकबाल साखरे, पोलीस पाटील हसन खॉं पठाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सीईओंचा किटा येथे रात्रभर मुक्काम
By admin | Updated: March 7, 2016 02:19 IST