यवतमाळ : पंचायत समिती अंतर्गत कोट्यवधीच्या मुद्रांक शुल्क अपहार प्रकरणी दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी चौकशी समितीला सहकार्य केले नसल्याने ही कारवाई करण्यात आलीे आहे. शहरालगतच्या ग्रामपंचयतींमध्ये सुमारे आठ कोटींचा मुद्रांक शुल्क अपहार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. या चौकशी समितीला वाकीचे ग्रामसेवक यु.एस. माने आणि पिंपळगावचे ग्रामसेवक पी.जी. कोराम यांनी सहकार्य केले नाही. कोराम यवतमाळ ग्रामीणला ग्रामसेवक होते. तर माने लोहारा येथे ग्रामसेवक असताना जवळपास १८ लाख २९ हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क हडप करण्यात आला. चौकशी समितीला दोन्ही ग्रामसेवकांनी कोणतेच सहकार्य केले नाही. तसेच कार्यकाळातील दफ्तरही उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. या ग्रामसेवकांसह यवतमाळ पंचायत समितीतील तत्कालिन पंचायत विस्तार अधिकारी प्रल्हाद पारवे यांच्याविरोधात प्रभारी गटविकास अधिकारी संजय ईश्वरकर यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. शिवाय इतर १५ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक आणि आणखी एका विस्तार अधिकाऱ्याचा या अपहार प्रकरणात सहभाग आहे. मात्र त्यांना अभय मिळत असल्याची चर्चाही आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मुद्रांक शुल्क अपहारात दोन ग्रामसेवक निलंबित
By admin | Updated: December 20, 2014 02:11 IST