विद्यार्थी त्रस्त : ग्रामीण फेऱ्या रद्दचा आजार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाहीयवतमाळ : विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही. घरी जाण्यास उशीर होतो. नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे उत्पन्न नसल्याच्या बोंबा ठोकल्या जातात, तर दुसरीकडे अनेक फेऱ्या रद्द होतात. हा प्रकार केवळ वेळापत्रक कोलमडल्याने होत आहे. वरिष्ठांचा इतर अधिकारी आणि कामगारांवर वचकच राहिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. यवतमाळसह जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये हा प्रकार सुरू आहे. विशेषत: ग्रामीण भागातील फेऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनमानी काम सुरू असल्यामुळे ऐन वेळेवर फेऱ्या रद्द केल्या जातात. मर्जीतील लोकांना त्यांच्या सोयीनुसार ड्युटी दिली जात असल्याची ओरड अन्यायग्रस्त कामगारांमधून होत आहे. या दुजाभावातूनच कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊन शेड्युल रद्दचे प्रकार घडत आहे. याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. मार्गावर उशिरा धावणाऱ्या बसेसेमुळे बहुतांश शाळांमधील विद्यार्थी पहिल्या तासिकेला मुकतात. एकीकडे शाळेच्या वेळेवरच बसेस सोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यातही उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. काही वेळा तर विद्यार्थी घरी पोहोचण्यासाठी बसेसची व्यवस्थाच रहात नाही. याशिवाय नागरिकांनाही या गंभीर प्रकाराला तोंड द्यावे लागते. गावासाठी बसफेरी असल्याचा विचार करून प्रतीक्षेत राहणाऱ्या नागरिकांना ऐनवेळी बसफेरी रद्द झाल्याचे सांगितले जाते. अशावेळी त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. काही प्रसंगी तर ही वाहनेही उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुक्कामाचीही वेळ त्यांच्यावर येते. याविषयी तक्रारीनंतरही नियोजन होत नाही. (वार्ताहर)
एसटीचे वेळापत्रक कोलमडले
By admin | Updated: October 25, 2015 02:23 IST