‘पोलखोल’ : ठाणेदारासह सर्वच पोलीस कर्मचारी अनभिज्ञ, तासभर घेतली झाडाझडतीउमरखेड : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी उमरखेड पोलिसांच्या रात्रगस्तीची शुक्रवारी पोलखोल केली. एसपी स्वत: मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत उमरखेडमध्ये पेट्रोलिंग करीत होते. परंतु उमरखेड ठाणेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याची पुसटशी कल्पनाही आली नाही. अर्थात उमरखेड ठाण्याचा कुणीही कर्मचारी रात्रभर कुठेच गस्तीवर नव्हता, हे एसपींच्या भेटीने सिद्ध केले. आता कागदोपत्री पेट्रोलिंग दाखविणाऱ्या उमरखेड ठाणेदारावर एसपी काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार रात्रगस्त सुरू असल्याचे वरिष्ठांना सांगतात. या गस्तीमुळे चोऱ्या-घरफोड्या कमी झाल्याचा दावाही केला जातो. मात्र खरोखरच ही पेट्रोलिंग कशी चालते याचा नमुना उमरखेड शहरात खुद्द पोलीस अधीक्षकांनीच उघड केला. पोलीस अधीक्षक आपल्या पथकासह मध्यरात्री उमरखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी नांदेड रोड, पुसद रोड, महागाव रोड, ढाणकी रोड या शहराच्या चहूबाजूने रात्रभर गस्त केली. पहाटेपर्यंत ते शहराच्या विविध भागाची पाहणी करून गस्त करीत होते. मात्र बाभूळगावहून नव्यानेच बदलून आलेले उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती. पहाटे जेव्हा एसपी गावात असल्याचे कळाले तेव्हा पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. एसपींनी सकाळी ११ वाजता ठाणेदार व पोलिसांची सुमारे तासभर बैठक घेऊन चांगलीच झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. रात्री १२ पासून दुपारी १२ पर्यंत एसपी उमरखेडमध्ये तळ ठोकून होते. पहाटे अचानक शहराच्या चौकाचौकात वाहतूक पोलीस दृष्टीस पडल्याने उमरखेडकर नागरिकांनाही आश्चर्य वाटले. एरव्ही दिवसा आणि गर्दीच्या वेळीही वाहतूक पोलिसांचे दर्शन होत नाही, हे विशेष. एसपींच्या या रात्रगस्तीत नेमका कुठे काय गैरप्रकार आढळून आला हे मात्र कळू शकले नाही. त्याबाबत गोपनीयता पाळली जात आहे. गणेशोत्सवादरम्यान उमरखेडमध्ये दगडफेक झाल्याने शांततेला गालबोट लागले होते. त्या पार्श्वभूमीवर एसपींची ही अकस्मात भेट महत्वाची मानली जाते. (शहर प्रतिनिधी)
एसपींची उमरखेडमध्ये रात्रभर गस्त
By admin | Updated: October 23, 2016 01:56 IST