देखभालीसाठी अनुदान : सुरक्षिततेच्या दृष्टीने उतरविला जाणार विमा यवतमाळ : जिल्ह्यातील बहुतांश क्रीडा संकुलांची सध्या दूरावस्था झाली असून यामुळे या संकुलांच्या मूळ हेतुलाच धक्का लागत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने क्रीडा संकुलाच्या देखभालीकडे लक्ष दिले आहे. या क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी यावर्षीपासून अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संकुले कात टाकणार आहेत. सध्याच्या क्रीडा संकुलाच्या योजनेनुसार विभागीय, जिल्हा, तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी अनुक्रमे २४ कोटी, आठ कोटी व एक कोटी रुपये अनुदान दिले जाते. यानंतर या संकुलांच्या देखभालीसाठी द्यावयाच्या निधीची तरतूद २००३ मध्येच करण्यात आली आहे. त्यानुसार देखभालीसाठी विभागीय क्रीडा संकुलाला प्रथम वर्षी १५ लाख रुपये, व्दितिय वर्षी १२.५० रुपये आणि तृतीय वर्षी १० रुपयांची तरतूद आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी प्रथम वर्षी दहा लाख, व्दितीय वर्षी साडेसात लाख आणि तृतीय वर्षी पाच लाख तर तालुका क्रीडा संकुलासाठी प्रती वर्षी तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रमाणे क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद असली तरी या प्रकाणे देय निधीच्या वापरासाठी अद्याप निकष निश्चित केलेले नाहीत. दरम्यान यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने त्यांच्या १९ आॅक्टोबर २०१५ च्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने या योजनेत सन २०१५-१६ मध्ये उपलब्ध अर्थसंकल्पित करण्यात आलेला दोन कोटी ८० लाख तरतुदींपैकी महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, २०१५ अन्वये एक कोटी ४६ लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दोन कोटी ८० लाख तरतुदींपैकी १ कोटी ४६ लाख निधीच्या अनुदानाच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे. हा निधी खर्च करण्यासाठी काही निकष व अटी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घालून दिल्या आहेत. त्यानुसार संकुलाचा विमा उरविताना प्रामुख्याने केंद्र शासनाचा उपक्रम असणाऱ्या विमा कंपनींकडूनच संकुलांना संरक्षण घ्यावे, या योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात मिळणाऱ्या अनुदानाचे वितरण शासन मान्यतेने करण्यात यावे, प्रती वर्ष संकुल देखभालीसाठी प्रस्तावित केलेले अनुदान क्रीडा संकुलास प्राप्त होणारे उत्पन्न यातून येणारी तूट यापैकी किती रक्कम कमी असेल, अशी रक्कम अनुदान म्हणून मंजूर करण्यात यावी आदी अटी घालून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या देखभालीवरील खर्चामुळे क्रीडा संकुलांचा विकास होऊन यवतमाळ जिल्ह्यातील जे क्रीडा संकुले देखभालीअभावी निरुपयोगी ठरत आहेत, अशा संकुलांना पुन्हा उभारी मिळून खेळाडूंना त्यांचा फायदा होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
क्रीडा संकुले टाकणार कात
By admin | Updated: December 14, 2015 02:29 IST