पोस्टल ग्राऊंडचे दुकान गाळे : मंजुरीविनाच झाले बांधकाम, आता नगरपरिषदेत ठराव यवतमाळ : स्थानिक पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथील दुकान गाळ्यांचा तीन-तेरा कारभार शनिवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान उघडकीस आला. सदर दुकान गाळे बांधलेली जागा महसूल विभागाची असून त्यासाठीचा निधी हा नगर विकास विभागाचा आहे. महसूल विभागाच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम खात्याने या गाळ्यांचे बांधकाम केले. मात्र त्याला नगर परिषद- नगररचना विभागाची मंजुरी घेतली गेली नाही. वास्तविक नगरविकास विभागाचा हा निधी खर्च करण्याचे अधिकार नगरपरिषदेला आहेत. बांधकाम सुरू करण्यापूर्वी ती जागा महसूल विभागाने नगरपरिषदेला लिजवर देणे आवश्यक होते. त्यानंतरच बांधकाम क्रमप्राप्त होते. आता या चुकीची दुरुस्ती केली जात आहे. महसूल विभागाने नगरपरिषदेला सूचना पत्र दिले आहे. नगरपरिषदेमध्ये जागा हस्तांतरणाची मागणी करून तसा ठराव घ्या असे या पत्रात नमूद आहे. त्यानुसार शनिवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेतला गेला. नगरसेविका अस्मिता चव्हाण यांनी ठरावावर आक्षेप घेत त्यामध्ये काही सूचनांचे निवेदनही सभागृहात दिले. आता महसूल व नगरपरिषद यांच्यात संयुक्त करार होईल. लिलावाचे अधिकार मात्र महसूल विभागाकडे राहतील. लिज व करारापोटी लिलावातून मिळणाऱ्या रकमेचा काही वाटा महसूल विभागाला दिला जाणार आहे. गेल्या आठवड्यात या दुकान गाळ्यांचा लिलाव होणार होता. मात्र ऐनवेळी तांत्रिक दोष उघड झाल्याने ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थानिक इंदिरा गांधी मार्केटमधील कुणाल टेक्सटाईल्सच्या अतिक्रमणाचा मुद्दाही चांगलाच गाजला. हा विषय आता १५ डिसेंबरच्या सभेत चर्चेला येणार आहे. नगर परिषदेने पोस्टल मैदान ताब्यात घेण्याची सूचना अमोल देशमुख यांनी मांडली. (कार्यालय प्रतिनिधी)
जागा महसूलची, निधी नगरविकासचा
By admin | Updated: December 6, 2015 02:22 IST