शिक्षकांचा फंडा : सोईच्या बदल्यांची धडपड, किन्हीत सर्वच पदाधिकारी यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील रोडटच गावच्या शाळेत नोकरी करण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून सवय जडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी यावेळी पुन्हा जुनाच फंडा वापरणे सुरू केले आहे. या सोईच्या बदलीसाठी कुणी कागदावर अपंग होण्यास तयार आहे तर कुणी आपण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे भासवून शासनाच्या एका जीआरमधील तरतुदीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यवतमाळ पंचायत समितीमध्ये यासाठी जणू शिक्षकांचा मेळाच भरला आहे. शहरालगतच्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा परिषद शाळात सवलतीवर कित्येक वर्षांपासून शिक्षकांनी मुक्काम ठोकला आहे. मुख्यालयी राहत असल्याने संघटना, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी उठबस असलेल्या या शिक्षकांना हलविण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्य शिक्षकांना नियमाप्रमाणे बदली मान्य राहते. मात्र घराजवळच नोकरी करण्यासाठी चटावलेल्या या शिक्षकांनी सवलतीचा फायदा घेण्यासाठी जुनाच फंडा वापरणे सुरू केले आहे. दोन दिवसांत पंचायत समितीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन अनेक शिक्षक आले. तर काहींनी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असल्याचे पत्र दिले आहे. यात तर किन्ही येथील शाळेच्या शिक्षकांनी कळसच केला. येथील एक शिक्षिका वगळता सर्वच शिक्षकांनी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे पत्र दिले आहे. वेळेवर अपंग प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांबाबतही संशय निर्माण झाला आहे. यापूर्वी बोगस अपंग शिक्षकांचे प्रकरण बाहेर आले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
कुणी अपंग तर कुणी पदाधिकारी
By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST