यवतमाळ : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेतर्फे ‘कौशल्य सेतू २०१६’ प्रशिक्षणाचे उद्घाटन अभ्यंकर कन्याशाळा येथे झाले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यंकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणीता काटेवाले होत्या. विस्तार अधिकारी राजू मडावी, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पंचभाई, शिक्षक परिषद अध्यक्ष राजेश मदने, विमाशीचे विजय खरोडे उपस्थित होते. तज्ज्ञ समुपदेशक किशोर बनारसे व प्रवीण मलकापुरे यांनी पॉवर प्वार्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षण विभागाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतु कार्यक्रम अमलात आणला आहे. जुलैमधील फेरपरीक्षेतील तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन विविध उद्योगधंद्यांमध्ये त्यांना रोजगाराची संधी कौशल्य सेतुमुळे मिळणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत दहावीच्या विषय शिक्षकांना आणि वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. दहावीत अनुत्तीर्ण होण्याची विविध कारणे असतात. परंतु संधी न मिळाल्यास शिक्षणाची दारे अशा विद्यार्थ्यांसाठी बंद होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. या सर्व बाबीचा विचार करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कौशल्य सेतु सुरू केला आहे. कौशल्य सेतुकरिता पात्र विद्यार्थ्यांचे १० आॅक्टोबरपर्यंत १०० टक्के रजिस्ट्रेशन पूर्ण करून संबंधित डेटा एनवायसीएसकडे हस्तांरित करण्यात यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक, समुपदेशक संघटनेचे अध्यक्ष किशोर बनारसे यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)
दहावी अनुत्तीर्णांसाठी कौशल्य सेतू
By admin | Updated: October 9, 2016 00:14 IST