यवतमाळ : शेतात जात असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला वाटेत अडवून तिचा विनयभंग केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीस सहा महिने सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्याचा निकाल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.पी. वानखडे यांच्या न्यायालयाने दिला. प्रशांत प्रभाकर देशमाथुरे (२०) रा. नांझा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथील १५ वर्षीय मुलगी १२ जानेवारी २०१३ ला आपल्या शेतात जात होती. दरम्यान, मागावर असलेल्या प्रशांतने तिला पकडून बळजबरीने शेतात नेले. तसेच अत्याचाराचा प्रयत्न केला. ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली. त्यामुळे तो तेथून पसार झाला. तत्पूर्वी त्याने पीडित मुलीला वाच्यता न करण्यासाठी पैसे देण्याचे अमिषही दाखविले. घटनेनंतर या प्रकरणी कळंब पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. हा खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.पी. वानखडे यांच्या न्यायालयापुढे चालला. चार साक्षी तपासून दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अॅड.नरेंद्र मेश्राम यांनी युक्तिवाद केला. (स्थानिक प्रतिनिधी)
विनयभंगातील आरोपीस सहा महिन्यांचा सश्रम कारावास
By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST