एसडीओ कार्यालयावर धडक : पुरस्कार घोषणेत अन्यायाचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात किसान गणेश मंडळावर अन्याय झाल्याचा आरोप करीत शहरातील गणेश मंडळांसह सामाजिक संस्थांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. मूकमोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाच्यावतीने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातून २४ मंंडळांची यादी प्राप्त झाली होती. जिल्हास्तरीय निवड समितीने २४ प्रस्तावांचे गुणांकन करून किसान गणेश मंडळाला १२५ गुण देवून प्रथम पुरस्कार घोषित केला होता. परंतु यादीत नाव नसलेल्या यवतमाळच्या एका गणेश मंडळाला पुरस्कार देवून किसान मंडळाची घोर निराशा केली. या प्रकाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मांडण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळ आणि सामाजिक संस्थांनी गुरुवारी मूकमोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील बेचेवार, नगरपरिषद शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, अशोक कुर्मे, डॉ.जवने, गजानन रासकर, शिवा दुधेवार, सुनील दगडफोडे, श्याम दुधेवार, प्रफुल्ल दुधेवार, बाळा दुधेवार, सागर दिघेवार, किरण दुधेवार यांनी केले. मोर्चात शहरातील विविध गणेश मंडळांसह सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. हातात फलक घेवून हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस यांना निवेदन दिले. या निवेदनात किसान मंडळाचा पुरस्कार पळविणाऱ्या प्रकरणाची चौकशी करून हा पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. देखाव्यातून दिला होता एकतेचा संदेशसर्वधर्म समभाव जोपासत दरवर्षी किसान गणेश मंडळ विविध देखावे सादर करते. एकतेचा संदेश देणाऱ्या किसान मंडळाने यावर्षी जलसंवर्धनसारख्या महत्त्वाच्या विषयावर लोकजागृती केली. व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांच्या मार्गदर्शनात व्यंगचित्राद्वारे जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. परंतु पुरस्कार घोषित करताना या मंडळावर अन्याय झाल्याचा आरोप आहे.
उमरखेडमध्ये ‘किसान’चा मूकमोर्चा
By admin | Updated: June 9, 2017 01:47 IST