वसंताची चाहूल : वृक्षराजींना हिरवाईचे डोहाळेसंतोष कुंडकर वणी हळव्या मनाने शिशिराला निरोप देणाऱ्या वृक्षराजींना आता हिरवाईची आस लागली आहे. दूर रानात पानगळतीचा भावविभोर सोहळा साजरा होत असतानाच पर्णगळतीने व्याकूळ झालेले रान हिरवा शालू पांघरण्यासाठी तेवढेच आतुरही झाले आहे. शिशिराचं निरोप घेणं जेवढं वेदनादायी, तेवढच उदासवेड्या वनराईसाठी हिरवेपणाचं आंदण घेऊन येणाऱ्या वसंत ऋतूचं आगमनही मोहरून टाकणारं असतं. अशा दुहेरी संदर्भानं सजलेला पानगळतीचा हा भावविभोर सोहळा मात्र मनामनातील उदास भावना अधिकच गहिऱ्या करतो. शरदाच्या चांदण्यातील गुलाबी गारव्याची अपूर्वाई अनुभवल्यानंतर निसर्गाला वसंत ऋतूची चाहूल लागते. याच मोसमात झाडावेलींवरील पानांचं गळून पडणं अन् मग पुन्हा कोळव्या पानांनी झाडावेलींना सजविण्याचा बहारदार सोहळा रंगत असताना रानवाटा मात्र एक अनामिक दु:खानं गहिवरल्या असतात. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटू लागली की, दूर रानात कोकीळेच्या कंठातून अस्वस्थ करणाऱ्या कातर स्वरांनी सारी धरित्री शहारून उठते. याच मोसमात रान सजते ते पळसफुलांनी. निसर्गाशी पळसफुलांचं नातही तसं अतुटच. वसंताची चाहूल लागली की, पळसवृक्षांनाही पानगळतीचे डोहाळे लागतात अन् मग पळसवृक्ष बहरून येतो लालचुटूक फुलांनी...! पळसवृक्षही निसर्गावर लाल-केशरी रंगाची मुक्त उधळण करतात. फाल्गुनातील रंगोत्सव हा तसा साऱ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. रंगोत्सव अन् पळसफुलांचं नातंही त्यांच्या रंगाईतकचं गहिरं...! पानगळ सुरू असतानाच रानावनातील पळसवृक्षही अग्नीफुलांचा साज लेवून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज असतात अन् मग लालगहिऱ्या रक्तफुलांनी नटलेली ही वनराजी अधिकच देखणी वाटू लागते.
शिशिराला अलविदा म्हणत सजतोयं पानगळतीचा सोहळा...!
By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST