यवतमाळ : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना नेते संजय राठोड यांना हटविल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी हा फेरबदल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला आहे. शनिवारी शिवसैनिकांनी दिग्रस येथे मानोरा चौकात टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काही तास वाहतूक रोखून धरण्यात आली होती. राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रिपदी कायम ठेवावे, अशा मागणीचे निवेदन राळेगाव येथे आदिवासी परधान समाजातर्फे उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्याच्या अन्य भागातही पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांचे फेरबदल करण्यात आले. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना वाशिमची जबाबदारी दिली गेली. तर भाजपा नेते ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांची यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. राठोड आता यवतमाळचे सहपालकमंत्री तर मदन येरावार वाशिमचे सहपालकमंत्री आहेत. राळेगावचे भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या कळंब येथील भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला गुरुवार २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. ते येथून मुंबईत परत जाताच पालकमंत्र्यांमध्ये फेरबदल झाल्याने कळंबमध्येच या फेरबदलाचे राजकारण शिजले असावे, असा संशय शिवसैनिकांना आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध करीत शनिवारी आंदोलन केले. संजय राठोड यांना पुन्हा यवतमाळचे पालकमंत्री पद बहाल करावे, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
शिवसैनिकांनी दिग्रसला टायर जाळले, राळेगावात निवेदन
By admin | Updated: January 1, 2017 02:22 IST