यवतमाळ : मार्तंडा बिटमधील राखीव वनात सागवान कत्तल झाली नसल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या वनाधिकाऱ्यांची उपवनसंरक्षकांच्या (डीएफओ) पाहणीनंतर बोबडीच वळली. या वनातील शेकडो सागवान वृक्षांच्या कत्तलीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसीध्द झाले. त्यानंतर डीएफओंची दिशाभूल करण्यासाठी सहाय्यक उपवनसंरक्षक, आरएफओ आणि क्षेत्रसहायकाने प्रयत्न चालविले. अखेर डीएफओंनी जंगल गाठताच कत्तलीवर शिक्कामोर्तब झाले. जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमधील राखीव वनातील दुर्गम भागात असलेल्या शेकडो परिपक्व सागवानांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. तसेच वाहनाद्वारे लाकूडसाठा लंपास केला. या गंभीर घटनेची माहिती यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मार्तंडा बिटमधील कक्ष क्र. २१२ आणि पहूर शिवारातील कक्ष क्र. २१७ मध्ये शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसीएफ अविनाश घनमोडे, जोडमोहा वनपरिक्षेत्र अधिकारी आर. के. पटवारी, क्षेत्रसहायक सुभाष मनवर आणि दक्षता पथकाचे डीएफओ एस.एस. दहिवले यांनी मार्तंडा राखीव वनाची तपासणी चालविली. मात्र तीन ते चारवेळा तपासणी करून सागवान कत्तल आढळली नसल्याचे सांगितले. तसेच डीएफओ लाकरा यांची दिशाभूल करणारा अहवालही सादर केला. त्यानंतर मात्र खात्रीलायक माहिती मिळताच बुधवारी दुपारी खुद्द डीएओ लाकरा यांनी या जंगलाला अकस्मात भेट दिली. यावेळी कक्ष क्र. २१२ मध्ये काही अंतर चालताच त्यांना शेकडो वृक्षांची कत्तल आढळून आली. कत्तलीची साक्ष देणाऱ्या थुटांची छायाचित्रेही घेतली. तसेच तत्काळ या बिटचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले. पांढरकवडा वन विभागाच्या पथकाकडून या जंगलाचे सुक्ष्म निरीक्षण करण्यासाठी क्रॉसचेकिंगही चालविली आहे. वनाधिकाऱ्यांकडून दडपण्याचा प्रयत्न झालेली ही कत्तल उघडकीस येताच त्यांची चांगलीच बोबडी वळली. (स्थानिक प्रतिनिधी)
मार्तंडा जंगलातील कत्तलीवर शिक्कामोर्तब
By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST