किन्ही (जवादे) : नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. लहान मोठे अपघात ही बाब नित्याची झाली आहे. अनेक घटनांमध्ये वाहनधारकांचे बळी गेले आहे. भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे हे अपघात होत आहेत. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पुढे असलेल्या ट्रकवर मागे असलेला ट्रक आदळला. यात एक जण जखमी झाला. शेकडो वाहनांची वर्दळ या मार्गावरून आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. मागील काही दिवसांपासून संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. वाहतूक सुरळीत व्हावी हा यामागील उद्देश आहे. मात्र चांगल्या झालेल्या रस्त्यावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहे. प्रामुख्याने वळण रस्ता असलेल्या ठिकाणी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी सकाळी बोरी(इचोड) या गावाजवळ असलेल्या वळणावर सी.जी.०४/जेआर-०९०४ या ट्रकवर एम.पी.२२/एच-०७२४ या क्रमांकाचा ट्रक मागाहून आदळला. याघटनेत एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार अमोल माळवे घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेमुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. (वार्ताहर)
राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका
By admin | Updated: November 2, 2015 01:51 IST