अपघातात काका-पुतण्या ठार : करंजीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, लग्नाचा आनंद विलापात बदलला, मंगी गावावर शोककळा प्रवीण पिन्नमवार पांढरकवडा लग्नाचा दुसरा दिवस.. घरी पाहुण्यांची गर्दी.. नवरदेवाच्या अंगावरची हळद अजून कायमच.. ऐनवेळी खरेदीची गरज पडली अन् नवरदेवच दुचाकी घेऊन बाहेर पडला. परत येताना भरधाव ट्रक काळ झाला. नवरदेव, त्याचा काका ठार झाले. भाचाही गंभीर जखमी झाला. काळजाचा ठोका चुकविणार हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर करंजी पोलीस चौकीसमोर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता घडला.मंगेश छोटू मेश्राम (३२) रा. मंगी आणि रामचंद्र फकरू मेश्राम (६०) रा. मंगी अशी मृत्यू पावलेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. तर अतुल राजू घोडाम (२०) हा गंभीर जखमी झाला आहे. मंगी येथे अपघाताची वार्ता पोहोचताच एका क्षणात लग्नाचा आनंद विलापात बदलून गेला. मंगी येथील मंगेशचे सोमवारीच लग्न झाले. राळेगाव तालुक्यातील झुमका चाचोरा गावात थाटात त्याने जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाची वरात सायंकाळी मंगी येथे घरी परतल्यावर आनंदी आनंद उसळला होता. नव्या सुनेचे स्वागत करण्यासाठी आप्त मंडळी उत्साहाने धावपळ करू लागली. मंगळवारी घरी जमलेल्या पाहुण्यांचा योग्य आदरसत्कार करावा, असा विचार मंगेशने केला होता. त्यासाठी तातडीने काहीतरी खरेदी करून आणू म्हणून तो दुचाकी (एमएच २९ एजे ४२२५) घेऊन करंजीकडे रवाना झाला. सोबत काका रामचंद्र मेश्राम आणि भाचा अतुल घोडाम यांनाही घेतले. मामाला मागे बसवून गाडी अतुलच चालवित होता. करंजीतील काम आटोपून ते दुपारी मंगीकडे परत निघाले होते. करंजी पोलीस चौकीपुढे वळणावरून दुचाकी वळविताना त्यांचा तोल गेला आणि दुचाकी पडली. तिघेही रस्त्यावर पडले. कुणालाच लागले नाही. ते उठण्याच्या बेतात असतानाच त्यांच्या मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच ३४ एबी ६२२३) त्यांना चिरडले. अंगावरून कंटेनर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. वृद्ध रामचंद्र मेश्राम तर जागीच ठार झाले. गंभीर अवस्थेतील मंगेश आणि अतुल यांना काही लोकांनी दवाखान्यात नेण्याची तयारी केली. परंतु, काही अंतर कापताच मंगेशची प्राणज्योत मालवली. गंभीर जखमी अतुल घोडाम याला यवतमाळ येथे हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक मुखेद अहमद नमीम अहमद (२४) वाहनासह पसार झाला. मात्र, करंजी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. वरातीचे वऱ्हाडी लागले अंत्ययात्रेच्या तयारीलामेश्राम कुटुंबीयांनी गेल्या काही दिवसांपासून मंगेशच्या लग्नाची अत्यंत उत्साहात तयारी केली होती. सर्वच नातेवाईकांना आग्रहाचे निमंत्रण पाठवून लग्नाला बोलावून घेतले होते. लग्नही आनंदात झाले. जवळची आप्त मंडळी मंगळवारी थांबली होती. मात्र, मंगळवारी एका क्षणात सारे वातावरणच बदलून गेले. खुद्द नवरदेवच साऱ्यांना सोडून निघून गेला. नव्या नवरीच्या विलापाला तर पारावारच उरला नव्हता. संसार सुरू होण्यापूर्वीच जोडीदार निघून गेला होता. सोमवारी मंगेशच्या वरातीत उल्हासाने सहभागी झालेले ज्येष्ठ नातेवाईक आज दवाखाना, उपचार अन् शेवटी अंत्ययात्रेच्या तयारीत गुंतले होते. हा विदारक प्रसंग पाहून अख्खे मंगी गावच हळहळत आहे.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणावर काळाचा घाला
By admin | Updated: December 2, 2015 02:31 IST