यवतमाळ : ऐन दिवाळी सणाच्या काळात बाजारात तुडुंब गर्दी असताना सोमवारी दुपारी नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने येथील सराफा बाजारातील दोन दुकानांमध्ये अचानक सर्च केला. दुपारी ३.३० वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच होती. एकेका दस्तऐवजाची बारकाईने पाहणी करीत कागद गोळा केले जात होते. यावेळी परिसरातील सराफा व्यावसायिकांत विविध चर्चेला उधाण आले होते. शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्स अशी सर्च राबविण्यात आलेल्या सराफा दुकानांची नावे आहे. शाह आभूषण हे रिंकू शाह यांचे तर शाह ज्वेलर्स हे नीलेश शाह नामक सराफा व्यावसायिकाचे आहे. सोमवारी दुपारी दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांंची भरगच्च गर्दी होती. त्यातच ३.३० वाजताच्या सुमारास नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या पथकाने अचानक दोनही दुकानांमध्ये एकाच वेळी धाड घातली. तसेच ग्राहकांना बाहेर काढून कागदांची तपासणी सुरू केली. हे पाहून परिसरातील व्यावसायिक आणि बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती. दुकानात कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. तसेच विविध चर्चेला उधाण आले होते. आयकर पथकाकडून दोनही दुकानातील पावती पुस्तके, गहाण खत, खर्चाचे विवरण अशा अनेक बाबी बारकाईने तपासल्या जात होत्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. यावेळी पथकाने संगणकाचीसुद्धा तपासणी केली. तसेच एकएक कागद पडताळून महत्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात एका आयकर अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्याने खासगीत बोलताना शाह ज्वेलर्स आणि शाह आभूषण या प्रतिष्ठानांकडून आयकर मोठ्या प्रमाणात चोरी केला जात असल्याच्या तक्रारी होत्या. गोपनीय माहितीवरून तुर्तास हा सर्च राबविण्यात आला. आक्षेपार्ह दस्तऐवज ताब्यात घेतल्या जातील, तपासणी दरम्यान आयकर चोरी लक्षात आल्यास संबंधित सराफा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
सराफा बाजारात दोन ठिकाणी सर्च
By admin | Updated: October 20, 2014 23:19 IST