पुसद : तालुक्यात पाणीटंचाई ही वर्षभरही कायम असते. उन्हाळ्यात तर अतिशय भीषण परिस्थिती असते. त्यामुळे तालुक्यात कुठे ना कुठे टँकर सुरूच असतो. आता मात्र पुसद तालुक्याला टँकरमुक्त करण्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी जोर दिला आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहे.पंचायत समिती पुसद येथे पाणीपुरवठा विभाग आणि सिंचन विभागाचा आढावा नुकताच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांनी घेतला. यावेळी संबंधित विभागांचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील ज्या गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होवू शकते अशा गावांमध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या जावू शकतात या बाबत चर्चा करण्यात येवून टंचाईग्रस्त गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला. विहीर खोलीकरण, विहीर अधिग्रहण, विहिरीतील गाळ काढणे, नवीन हातपंप घेणे आदी उपाययोजना राबवून तालुक्याला शक्य तितक्यालवकर टँकरमुक्त करण्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी जोर दिला.सिंचन विभागाच्या आढावा सभेत तीन सिंचन तलाव घेण्याचे ठरले. यामध्ये पन्हाळा, नानद पाझर तलाव व सावरगाव बंगला आदींचा समावेश आहे. सावरगाव बंगला येथील पाझर तलाव प्रस्तावित करण्यात आला. विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत १५ तलावांची कामे हाती घेण्यात आली. सिंचन विभागामार्फत पुसद विभागात आठ सिंचन तलाव, ३९ पाझर तलाव, तीन साठवण तलाव, दहा कोल्हापुरी बंधारे, दहा गाव तलाव, दोन माळगुजारी तलाव मंजूर झाले असल्याची माहिती सिंचन विभागामार्फत देण्यात आली आहे.त्याचबरोबर १५०० सहस्त्र घनमीटर पाणी उपलब्ध असल्यास तलावांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, अशी अट असून त्यासाठीचे प्रमाणपत्र हे नाशिक येथून प्राप्त करून घ्यावे लागते. या किचकट अटीमुळे पुसद तालुक्यातील बऱ्याच ठिकाणचे प्रकल्प रखडले असल्यामुळे ही अट शासनाकडून रद्द करण्यात यावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.फुफाटे यांनी सभेत सांगितले. पुसद तालुक्यातील अनेक गावांना वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. माळपठारावरील परिस्थिती तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय भीषण असते. त्यामुळे या नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.या सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, पंचायत समिती पुसदचे सभापती सुभाष कांबळे, उपसभापती अवधूत मस्के, जिल्हा परिषद सदस्य एस.व्ही. वद्देवार तसेच बी.एच. भुजाडे आणि पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुसद तालुका टँकरमुक्तीचा आराखडा
By admin | Updated: December 4, 2014 23:16 IST