यवतमाळ : गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून गेली पाच दिवसांपासून वितरण थांबविण्यात आले आहे. परिणामी चार हजार ग्राहक प्रतीक्षेत आहेत. दररोज हा आकडा वाढत आहेत. याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी तक्रारी घेणेही बंद केले आहे.जिल्ह्यात २५ गॅस एजंसी आहेत. दोन लाख ६५ हजार पाच ग्राहक सिलिंडरचा वापर करतात. ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या एचपी, इण्डेन आणि भारत गॅस कंपनीकडून पुरवठा होतो. यामध्ये इण्डेन गॅस एजंसीकडून गेली अनेक दिवसांपासून मागणीच्या तुलनेत सिलिंडरचा कमी पुरवठा केला जात आहे. जिल्हा पुरवठा विभागाने याबाबत संबंधित कंपनीला पत्र पाठविले आहे. मात्र कंपनीकडून या पत्राला कुठलेही उत्तर मिळाले नाही. यातून इण्डेन गॅसमध्ये ग्राहकांची प्रतीक्षा यादी वाढली आहे. अशीच स्थिती एचपी गॅसची झाली आहेत. गत पाच दिवसांपासून गॅस कंपनीने सिलिंडरचे वितरण थांबविले आहे. लिक्विड गॅस मिळाला नसल्याने कंपनीमध्येच सिलिंडर उपलब्ध नसल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. यातून गॅस सिलिंडरचा तुटवडा वाढला आहे. सर्वाधिक ग्राहक एचपी गॅसचे आहेत. यामुळे याठिकाणी ग्राहकांची गर्दी दररोज वाढत आहे. याबाबत पुरवठा विभागाला कंपनीने कुठलीही सूचना दिली नाही. यातून गोंधळ वाढला आहे. जिल्ह्यात चार हजार ग्राहक प्रतीक्षेत आहेत. इतकेच नव्हे तर, प्रतीक्षा यादी वाढल्याने आॅनलाईन नोंदणीची यंत्रणाही कोलमडली आहे. त्यामुळे ग्राहकांनी गॅस एजंसीकडे धाव घेतली आहे. सिलिंडर नसल्याने गॅस एजंसीवर दररोज ग्राहकांचा घोळका पाहायला मिळत आहे. (शहर वार्ताहर)
वितरण थांबल्याने सिलिंडरचा तुटवडा
By admin | Updated: February 12, 2015 01:45 IST