लोकमत न्यूज नेटवर्कपुसद (यवतमाळ) : तालुक्यातील हुडी खुर्द ग्रामपंचायतअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत करण्यात आलेल्या घरकुल वाटपात गंभीर अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून घरकुल बांधकाम केलेल्या कुटुंबांना हप्ते वितरित करण्यात आले. या प्रकरणात ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला तातडीने बडतर्फ करण्यात आले असून, सरपंच व सचिव अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत.
तालुक्यातील हुडी खुर्द येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार प्रभाकर पवार यांनी वरिष्ठ यंत्रणेकडे केली होती. घरकुल वाटप प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांऐवजी इतरांना लाभ दिला. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी सोयीने लाभार्थ्यांची नावे निश्चित केल्याचे तक्रारीत म्हटले होते. प्रशासनाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून येथील गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र देण्यात आले होते. चौकशीत अनियमितता उघड झाल्यानंतर आता ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी, असे आदेश देण्यात आले आहे.
समितीने अहवाल पूर्ण होईपर्यंत घरकुल मंजुरी प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने शिफारस केलेल्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करावी, असे आदेश दिले आहेत. घरकुल बांधकामानुसार जिओ टॅग करण्याची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण अभियंत्याची होती. त्यांनी कोणतीही शहानिशा न करता संबंधितांना घरकुलाचे हप्ते वितरित केल्याचे आढळून आले. त्यामुळे गृहनिर्माण अभियंत्याला तातडीने बडतर्फ करण्यात आले.
घरकुल हप्त्याची होणार वसुलीघरकुल योजनेचा घोटाळा उघड होण्यापूर्वी काही लाभार्थ्यांनी निधी प्राप्त करून घेतला. यमुना राठोड यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित केल्याचे अहवालात नमूद आहे. अरविंद सुदाम पवार, प्रमिला मधुकर राठोड यांनी मंजूर नामांकनापेक्षा कमी बांधकाम करूनसुद्धा त्यांना घरकुलाचा सर्व निधी वितरित केल्याचेही समोर आली.
"हुडी खुर्द ग्रामपंचायतअंतर्गत घरकुल योजनेत लाभार्थ्यांच्या प्रस्तावानुसार हप्ते वितरित प्रकरणात सरपंच व सचिवांचे खुलासे मागविण्यात आले आहेत. गृहनिर्माण अभियंत्यास तत्काळ कामावरून काढून टाकण्यात आले आहे. दोषी लाभार्थ्यांकडून घरकुलाचे हप्ते वसूल केले जातील. पुढील कारवाई सुरू आहे."
- अमोलकुमार आंदेलवाड, बीडीओ, पुसद.