मांगलादेवी : घराला लागलेल्या आगीतून गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात घर मालक जबर जखमी झाला. तर संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले. ही घटना नेर तालुक्यातील चिखली कान्होबा येथे बुधवारी रात्री घडली. मधुकर बनकर (५०) असे जखमी इसमाचे नाव आहे. बुधवारी रात्री अचानक त्यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील धान्य, कपडा-लत्ता, शिलाई मशीन आदी साहित्य जळून भस्मसात झाले. पावसामुळे घराच्या ओसरीत बांधलेली गाय या आगीत सापडली होती. या गाईला बाहेर काढण्यासाठी घरमालक मधुकर बनकर यांनी प्रयत्न केले. गाईला बाहेर काढताना तेही गंभीररीत्या भाजले. तसेच गाय आणि तिचे वासरुही मृत्यूशी झुंज देत आहे. हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच जखमी मधुकरला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. (वार्ताहर) तीन आठवड्यावर लग्नमधुकर बनकर यांच्या दीपाली नामक मुलीचे लग्न ६ मे रोजी आयोजित होते. त्यानिमित्त घरात उत्साहाचे वातावरण होते. लग्नासाठी धान्य, कपडा-लत्ता खरेदी केला होता. परंतु एका क्षणात संपूर्ण घरच भस्मसात झाले. आता मुलीचे लग्न कसे करावे असा प्रश्न मधुकरपुढे पडला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
आगीतून गाय वाचविताना एक गंभीर, घर बेचिराख
By admin | Updated: April 17, 2015 00:49 IST