श्यामबुवा धुमकेकर : कीर्तन महोत्सवातील सहावे पुष्पपुसद : अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य जन्म माणसाला प्राप्त झाला. त्याचे सोने करण्याची संधी आपणाला मिळाली. तेव्हा कृतार्थ जीवन जगून देशकार्यासाठी, समाजसेवेसाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात कीर्तनकार श्यामबुवा धुमकेकर यांनी येथे केले.देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयात कीर्तन महोत्सवात सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. महाराष्ट्र धर्माचे प्रणेते समर्थ रामदास स्वामी यांचा ‘देह त्यागिता कीर्ती मागे उरावी’ हा श्लोक त्यांनी पूर्वरंगात घेतला. या श्लोकाच्या समर्थनार्थ उत्तरंगात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सहकारी नरव्याघ्र तानाजी मालुसरे यांचे आख्यान लावले. घरी एकुलत्या एका मुलाचे लग्न ठरले असताना माँ जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश शिरोधार्य मानून मोक्याच्या ठिकाणी असलेला कोंडाणा किल्ला प्राणाची बाजी लावून सर केला. या बलिदानाने शिवाजी महाराज सद्गतीत झाले आणि गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. घराचे मंगलकार्य बाजूला सारून देशकार्याला प्राधान्य देताना आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे त्यांचे उद्गार इतिहासात अजरामर ठरले आहे. या कीर्तनात वीररसपूर्ण शौर्यगाथा, पोवाडे, अनुरूप नाट्यगीत गाऊन अख्यान रंगततदार केले. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ हा पोवाडा आणि शुरा मी वंदिले हे नाट्यगीत रसिकांना भावले. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.उत्तम रुद्रवार यांनी कीर्तनकारांचा परिचय करून दिला. कीर्तनाच्या प्रारंभी श्यामबुवा धुमकेकर यांचा सत्कार वाचनालयाचे कोषाध्यक्ष रवी देशपांडे यांनी केला. यावेळी आशाताई चापके, स्मिता वाळले उपस्थित होते. कीर्तनाला साथसंगत प्रा.डॉ.चंद्रकिरण घाटे, संजय कोरटकर, गजानन गवळी यांनी केली. (प्रतिनिधी)
कृतार्थ जीवन जगण्यातच पुरुषार्थ
By admin | Updated: April 7, 2016 02:36 IST