अखिलेश अग्रवाल पुसदविदर्भ-मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील सेलू येथील जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भक्तीचा सुगंध दरवळत आहे. शेकडो भाविक दर्शनासाठी येथे रीघ लावून आहे. पुसदजवळील सेलू येथे सर्वात जुने आणि जागृत असे माता जगदंबा देवी देवस्थान आहे. पूर्वीच्या साध्या स्वरूपात असलेल्या जगदंबा माता मंदिराला आज भक्तांच्या सहकार्याने दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. मातेच्या गडावर चढताना प्रथम भव्य प्रवेश द्वार लागते. पायऱ्या चढून गेल्यावर जगदंबा माता मंदिराचा सपाट परिसर लागतो. पाण्याच्या टाकीजवळ हातपाय धुवून भक्त ताजे तवाणे होतात. मातेच्या मंदिराच्या सभा मंडपात पाय ठेवताच मनाला एक प्रकारे शांती लागते. मन प्रसन्न होते. नितांत श्रद्धेने आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी भक्त आईला साकडे घालतो. नवसाला पावणारी आई भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी धावून येते, असा भक्तांचा विश्वास आहे. ‘माझी जगदंबा माऊली, कल्पवृक्षाची सावली’ या ओवी गुणगुणत मातेचे दर्शन झाले की भक्त स्वत:ला धन्य समजतो. सेलू येथील मंदिरातील अंदाजे साडेतीन फूट रुंद व अडीच फूट उंच जगदंबा मातेचा मुखवटा आहे. एका अख्यायिकानुसार पुसद-उमरखेड मार्गावरील सेलू गावातील लक्ष्मण गवळी यांच्या आजोबांनी स्वत:च्या शेतातील टेकडीचे खोदकाम सुरू केले होते. या खोदकामाच्या वेळी मातेची मूर्ती आढळून आली. सदर मातेचे मंदिर हेमाडपंथी असून १०० ते १५० वर्षापूर्वी बांधकाम झाले असावे, लक्ष्मणराव गवळी यांचे वडील किसनराव गवळी यांनी मातेची श्रद्धापूर्वक सेवा केली. त्यानंतर लक्ष्मणराव मातेची सेवा करीत आहे. गवळी परिवार गत तीन पिढ्यांपासून अखंड सेवा करीत आहे. जगदंबा मातेच्या नवरात्रौत्सवात पुसद परिसरासह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नऊ दिवस सकाळच्या आरतीला भाविक अनवाणी पायाने मातेचा गड चढून येतात. जगदंबा मातेच्या मंदिराचा नवीन सभामंडप लोकवर्गणीतून बांधण्यात आला. माहूरची रेणुका माताही जगदंबेची लहान बहीण असून रेणुका मातेच्या मुखवट्यापेक्षाही येथील मुखवटा मोठा आहे.
सेलूच्या जगदंबा मंदिरात दरवळतो भक्तीचा सुगंध
By admin | Updated: October 21, 2015 02:46 IST