यवतमाळ : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आणि जिल्हाध्यक्ष आशीष मानकर यांच्या नेतृत्त्वात निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनातील हवा सोडण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात तातडीने दुष्काळी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, चारा छावण्या, पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था, दुष्काळग्रस्त गावात पाणीपुरवठ्यासंबंधी योजना मंजूर कराव्यात, त्यासंबंधीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावे, ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वाडी, वस्त्यांवर पाण्यासाठी सिन्टेक्सच्या टाक्या बसवून व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने तातडीने मागण्या पूर्ण न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची हवा सोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, सुमित बाजोरिया, पंकज मुंदे, नीलेश राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
मदतीसाठी रायुकाँचे हवा सोडो आंदोलन
By admin | Updated: December 8, 2014 22:40 IST