संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १० दिवस बाप्पांचे मनोभावे पूजन करून अनंत चतुर्दशीला शेकडो भाविकांनी येथील निर्गुडा नदीत विसर्जन केले खरे; मात्र गणेशपूर पुलाजवळील नदीच्या पात्रात पाणीच नसल्याने अनेक मूर्ती चिखलात फसून असल्याचे विदारक चित्र गुरूवारी येथे पहायला मिळाले. हा प्रकार पाहून अनेक भाविकांनी हळहळ व्यक्त केली. पालिका प्रशासन या विषयात काहीच करीत नसल्याचे पाहून अखेर सायंकाळी काही भाविकांनीच स्वत: पुढाकार घेऊन चिखलात फसलेल्या मूर्ती बाहेर काढल्या व निर्गुडा नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे, तेथे नेऊन मूर्तींचे विसर्जन केले.पावसाअभावी यंदा वणीतील निर्गु्डा नदीच्या पात्रात अल्प पाणी साठा आहे. गणेशोत्सवादरम्यान बºयापैैकी पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यात वाढही झाली. नदीतील पाणी वाहून जाऊ नये म्हणून अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस अगोदर पालिकेच्यावतीने गणेशपूर पुलावर डाव्या बाजुने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे बंधारा फुटून बरेच पाणी वाहून गेले. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस वणी शहरातील भाविकांनी या ठिकाणी गणेशाचे विसर्जन केले.दरम्यान, पावसानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली. वाढत्या उकाड्याने नदीतील पाणी वेगाने आटले. परिणामी नदीत विसर्जीत केलेल्या मूर्तीचे विघटन झाले नाही. त्या चिखलात तशाच फसून राहिल्या. गुरूवारी हा प्रकार अनेक भाविकांना खटकला. मूर्तींभोवती प्रचंड घाण, मोकट डुकरांचा वावर पाहून भाविकांचे मन दुखावले गेले. या मार्गाने दिवसभर ये-जा करणारे भाविक बाप्पांची अशी अवहेलना पाहून हळहळत होते. दरम्यान, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रशांत भालेराव, सूर्यकांत पायघन, संतोष लांजेवार, सुनिल छांगाणी यांच्यासह गणेशपुरातील तुषार, डुडूले, किशोर पिंपळकर या चिमुकल्यांनी पुढाकार घेऊन चिखलात फसून असलेल्या मूर्तींना बाहेर काढले. त्यानंतर या मूर्ती निर्गुडा नदीच्या प्रवाहात जेथे पाणी आहे, तेथे नेऊन पुन्हा विसर्जीत केल्या.मातीच्या मूर्ती स्थापनेबाबत भाविकांत उदासीनतापीओपीच्या मूर्ती पर्यावरणासाठी घातक आहेत. तशी जागृतीही केली जाते. मात्र या जागृतीचा कोणताही परिणाम वणीत दिसून आला नाही. केवळ मूर्तीच्या देखणेपणावर भाळून अनेकांनी पीओपीच्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्ती पाण्यात विरत नाहीत. त्यामुळे यंदा विसर्जनानंतर अनेक मूर्ती नदी पात्रात उघड्यावर पडून दिसत होत्या.
निर्गुडा नदीत ‘बाप्पां’ची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:20 IST
१० दिवस बाप्पांचे मनोभावे पूजन करून अनंत चतुर्दशीला शेकडो भाविकांनी येथील निर्गुडा नदीत विसर्जन केले खरे; मात्र गणेशपूर पुलाजवळील नदीच्या पात्रात पाणीच नसल्याने अनेक मूर्ती चिखलात फसून असल्याचे विदारक चित्र गुरूवारी...
निर्गुडा नदीत ‘बाप्पां’ची अवहेलना
ठळक मुद्देसर्वत्र हळहळ : पाण्याअभावी मूर्ती चिखलात फसून, अखेर भाविकांचाच पुढाकार