जिल्हा बँक : १४० शिपायांना मिळणार लाभ यवतमाळ : शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असला तरी या विषयात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. बँकेतील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची आता ५८ ऐवजी ६० वर्षेपर्यंत सेवा घेण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा नियमित कार्यकाळ केव्हाच पूर्ण झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून हे संचालक मंडळ अतिरिक्त कार्यकाळ उपभोगत आहे. नागपूर उच्च न्यायालयातील एका याचिकेच्या आडोशाने हे संचालक मंडळ कार्यरत आहे. प्रभारी संचालक मंडळ असल्याने जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा प्रस्ताव नाबार्डकडे प्रलंबित आहे. इकडे बँकेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. नोकरभरती होत नसल्याने कंत्राटी स्वरूपात भरती करून काम भागवावे लागत आहे. जिल्हा बँकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या १४० च्या आसपास आहे. या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात संचालक मंडळ बैठकीपुढे ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या प्रस्तावाचा आता तातडीने १० शिपायांना लाभ मिळणार आहे. शिवाय भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अन्य शिपायांनाही आता आणखी दोन वर्ष अधिकची सेवा जिल्हा बँकेला देता येईल. चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना ही वाढीव सेवा मिळाल्याने भविष्यात तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठीही हा निवृत्तीचे वय वाढविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिपायांच्या निवृत्ती वयवाढीमागे ‘डिलींग’ची चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शिपायांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६०
By admin | Updated: July 13, 2016 03:11 IST