डोंगरखर्डातून सुरुवात : दौरे व मुक्कामाची अधिकाऱ्यांना अॅलर्जी, शासनाचे निर्देश तुडविले पायदळीगजानन अक्कलवार कळंबजिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या प्रगतीसाठी नियोजित दौरे व रात्रीचा मुक्काम करावा, असे शासनाचे निर्देश आहे़ परंतु या आदेशाचे सर्रास उल्लघंण होत आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अनेक गावात मुक्काम करून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आता आमदार डॉ.अशोक उईके यांनीही गावात मुक्काम करून विकासाचा आराखडा तयार करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १९ मे रोजी ते डोंगरखर्डा येथे मुक्कामी राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना विकासात्मक कामाची प्रगती पाहण्याचे आदेश आहे़ एवढेच नाही तर, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या, तक्रारी, मते जाणून घेण्यासाठी संबंधित गावात अधिकाऱ्यांनी मुक्काम करावा, असेही शासनास अभिप्रेत आहे़ परंतु या आदेशाची कुठलीच अंमलबजावणी होत नाही. आमदार डॉ.अशोक उईके हे गावात मुक्काम करून सर्वस्तरातील नागरिकांशी हितगुज साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर विकासाचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. नजीकच्या काळात आमदाराचा गावात मुक्काम ही संकल्पना पहिल्यादाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सीईओ डॉ.कलशेट्टी हे स्वत: गावात जाऊन मुक्कामी राहायचे. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश द्यायचे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून क्षुल्लक कारणासाठी प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागायचे. त्यांच्या मुक्कामाचा प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांवर दबाव असायचा. आमदार डॉ.उईके यांच्या मुक्कामामुळेही असाच दबाव आता इतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. विकासाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी व जनतेचा सहयोग मिळण्यासाठी गावात मुक्कामी राहणे आवश्यक आहे. दौऱ्यावर जाताना किंवा दौऱ्यावर जाण्यापूर्वी कार्यालयाचे दौरा/हलचल पंजीमध्ये नोंद करून जाण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे़ असे असतानाही अधिकारी वर्ग आदेशाला केराची टोपली दाखवितात़ याकडेही डॉ. अशोक उईके यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. गाव विकासाच्यादृष्टीने या बाबी अधिक गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.अहवाल सार्वजनिक करण्याची गरजअधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावयाचे दौरे आणि रात्रीचा मुक्काम याबाबत वारंवार आढावा घेणे गरजेचे आहे़ त्यानुसार रात्रीचे दौरे व मुक्कामाची संख्या निश्चित करण्यात आली़ शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी व प्रगतीसाठी आपला सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे़ हा अहवाल सार्वजनिक केल्यास अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड पडू शकतो. परिणामी अनेक अधिकारी कागदावर मुक्काम करण्याऐवजी गावात मुक्काम करतील, असे मत नागरिकातून व्यक्त होत आहे.
राळेगावचे आमदार ठोकणार गावात मुक्काम
By admin | Updated: May 18, 2016 02:47 IST