अवमानाची भावना : १५ जूनच्या ‘डीपीसी’मध्ये पडसाद उमटण्याचे संकेत यवतमाळ : नवे जिल्हाधिकारी रुजू झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्यात कधी नव्हे एवढ्या वेगाने प्रशासन धावताना दिसत आहे. मात्र त्याच वेळी या व्यस्ततेमुळे भेटी मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. त्यातूनच भविष्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. यवतमाळात सचिंद्र प्रताप सिंग हे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून शासकीय यंत्रणेतील गतीमानता जनतेला अनुभवायला मिळत आहे. सिंह यांनी पहिल्या दिवसापासूनच बैठका आणि वेगवान कामांचा सपाटा लावला. सिंग यवतमाळात असताना बैठक झाली नाही, असा एकही दिवस उजाडला नाही. त्यांनी शिस्त, नियम, तंबी आणि कारवाईने का होईना जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा भरली. कुणी कर्तव्य म्हणून तर कुणी कारवाईच्या भीतीने धावू लागले आहेत. प्रशासनातील ही एवढी गतिमानता अलिकडच्या काळात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. तत्काळ कामे होत असल्याने जिल्ह्यातील जनता चांगलीच सुखावली असली तरी लोकप्रतिनिधींमध्ये मात्र काहीसा नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी बैठकांमध्ये सतत व्यस्त राहत असल्याने अनेकदा त्यांना लोकप्रतिनिधींना भेटणे शक्य होत नाही. नव्याने रुजू झाले म्हणून पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी आलेल्या अनेक लोकप्रतिनिधींना हा अनुभव आला. भेट नाकारल्याचा समज झाल्याने या लोकप्रतिनिधींमध्ये अवमानाची भावना निर्माण झाली. ही भावना ग्रामपंचायत सदस्यांपासून बड्या लोकप्रतिनिधींमध्येही पहायला मिळाली. त्यातच काहींनी सोईच्या बदल्या व अन्य कामांच्या अनुषंगाने शिफारसी केल्या. त्याचा विचार न झाल्याने अवमानाची ही भावना आणखी बळावली. त्यातूनच भविष्यात लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. नव्या जिल्हाधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधींसोबत १५ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधींमधील नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकप्रतिनिधींमधील अवमानाची ही भावना आत्ताच दूर न झाल्यास हा वाद मुंबईपर्यंत जाण्याचीही शक्यता राजकीय व शासकीय गोटात वर्तविली जात आहे. म्हणूनच आगामी डीपीसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी )
लोकप्रतिनिधी-प्रशासनात संघर्षाची चिन्हे
By admin | Updated: June 3, 2015 00:11 IST