भक्तांची मांदियाळी : परशुरामाने आईची कावड मुळाव्यात टेकविल्याची आख्यायिका दिनेश चौतमाल मुळावा विदर्भ व मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली उमरखेड तालुक्यातील मुळाची रेणुकादेवी माहूरच्या रेणुकेची प्रतिकृती आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या ठिकाणी नवरात्रात शेकडो भाविक दर्शनासाठी येथे येत आहेत.रेणुकामातेबाबत परिसरात एक आख्यायिका सांगितली जाते. दंडकारण्यातून परशुराम आपल्या आईची कावड घेऊन निघाले. मुळावा येथे त्यांनी रेणुकामातेची कावड ठेवली असता आकाशवाणी होऊन येथून १२ कोस अंतरावर कोरी भूमी आहे. त्या ठिकाणी परशुरामाने रेणुकामातेच्या मंदिराची स्थापना केली. मुळावा या ठिकाणी कावड ठेवल्यामुळे देवीचा मूळ वास या ठिकाणी आहे. त्यावरूनच या गावाला मुळावा असे नाव पडले असावे. माहूरगडाला जाताना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातील भक्त प्रथम रेणुकामातेचे दर्शन घेऊन नंतर माहूरकडे जातात. बाबासाहेब पुरंदरे यांनी ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी भेट देऊन येथील शीलालेखाचे वाचन केले. या मंदिराचा जीर्णोद्धार अहल्याबाई होळकर यांनी केल्याचा उल्लेख आहे, अशी माहिती त्यांनी व्यवस्थापक मंडळाला दिल्याचे संस्थानचे सदस्य रामभाऊ पाठक यांनी सांगितले.नवरात्र उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन तसेच सायंकाळी आरती केली जाते. नऊ दिवस सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रमही असतो. पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या मुळावा येथील रेणुकादेवीच्या सभोवती चार एकराचा रम्य परिसर आहे. समोर पुरातन काळातील बारव (विहीर) आहे. मंदिराच्या पायथ्याशी भक्त निवास बांधलेले आहे. देवीचा उत्सव येथील पाठक मंडळी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विश्वस्तांमध्ये असलेले सर्व सदस्य तन्-मन्-धनाने कार्य करतात. नवरात्र उत्सवात येथे भक्तांची मांदियाळी दिसून येते. मंदिराच्या चोहोबाजूंनी चिरेबंदी भिंती आहे. मुळावा येथील पुरातन असणाऱ्या गावाच्या वेशीमधून प्रवेश करावा लागतो. देवीच्या पाठीमागे भव्य सभागृह असून गावातील तसेच बाहेरगावातील भक्तमंडळींनी लोकवर्गणी करून या भव्य सभागृहाचे काम पूर्ण केले आहे. धार्मिक उत्सवाच्या कामामध्ये येथील देशमुख परिवार तसेच समस्त गावकरी सहभाग घेत असतात.
माहूरच्या रेणुकेची प्रतिकृती मुळाव्याची देवी
By admin | Updated: October 19, 2015 00:17 IST