यवतमाळ : शहरातील स्वच्छतेसाठी दिले जात असलेल्या कंत्राटाच्या रकमेत सातत्याने वाढ केली जात आहे. ६० लाख रुपयांपासून सुरू झालेले कंत्राट आता थेट तीन कोटी ११ लाखांच्या घरात पोहोचले आहे. त्यानंतरही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. परिणामी नगरपरिषदेला आता फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया राबवावी लागत आहे. स्वच्छतेसाठी शहराचे चार झोन करण्यात आले आहे. यात प्रभाग क्र. ७ चा स्वतंत्र झोन आहे. उर्वरित तीन झोनमध्ये ९ प्रभाग विभागण्यात आले आहे. यापूर्वी शहर स्वच्छतेसाठी दोन कोटी ६५ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्याची मुदत संपल्याने एक महिन्याचे कंत्राट दिले आहे. त्यासाठी १५ लाख रुपये नगरपरिषदेने मोजले आहे. नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाबा ताज आणि गाडगे महाराज या दोन संस्थांना कंत्राट दिले गेले आहे. वर्षभरासाठी कंत्राट देण्याकरिता नगरपरिषदेने निविदा प्रक्रिया राबविली. मात्र याला कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळाला नाही. केवळ दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये बाबा ताज आणि गाडगे महाराज या दोन संस्थांचाच समावेश आहे. नियमाप्रमाणे किमान तीन निविदा आल्याशिवाय त्या निविदा उघडता येत नाही. नगरपरिषदेने कंत्राटाची एकूण रक्कम वाढविल्यानंतरही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचऱ्याच्या कंत्राटाभोवती येथील अर्थकारण गुरफटले आहे. यापूर्वी झालेल्या अनेक राजकीय घडामोडीतून सिद्ध झाले आहे. आता नवीन कंत्राट कोणाला मिळणार, कोणती संस्था बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. शहराचा वाढलेला विस्तार बघता कंत्राटाची रक्कम वाढविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
६० लाखांचा घनकचरा सव्वातीन कोटींवर पोहोचूनही फेरनिविदा
By admin | Updated: February 2, 2015 23:13 IST