उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीमाफिया निर्ढावले असून कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे. बोरी(चातारी) परिसरात रेतीमाफियांनी कारवाईसाठी आलेल्या तलाठ्यावर गुरुवारी सायंकाळी हल्ला करून त्याला धमकाविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले. मराठवाड्यातील रेतीमाफिया तालुक्याच्या हद्दीत येवून पैनगंगा नदीपात्रात सातत्याने रेतीचा उपसा करत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी तहसीलदार शेजाळ यांनी एक पथक गठित केले. मंडळ अधिकारी पंडित आणि तलाठी सुरोशे, सानप, कानेडे यांचा त्यात समावेश केला. नदीच्या पात्रातून होत असलेल्या तस्करीची गोपनीय माहिती या पथकाने काढली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हे पथक चातारी शिवारात नदीपात्राकडे निघाले. रस्त्यात रेतीमाफिया देवीदास साहेबराव सूर्यवंशी रा.खडकी, ता.हिमायतनगर हा आपल्या ट्रॅक्टरजवळ बसून होता. त्याला तलाठी कानेडे यांनी विचारणा केली असता माझा ट्रॅक्टर बंद पडला आहे. याची राखण करण्यासाठी येथे बसून असल्याचे सांगत जवळ आलेल्या तलाठ्यावर तो धावून गेला. त्याने कॉलर पकडून कानेडे यांच्याशी झटापट केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कानेडेही गांगारून गेले. मात्र पथकातील इतर कर्मचारी लगेच घटनास्थळावर धावून आल्याने आरोपींनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याचा ट्रॅक्टर क्र. एम.एच.२९/व्ही-१४ हाही ताब्यात घेण्यात आला. या आरोपीला महसूल पथकाने उमरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर ३५३, ३२३, ५०४, ५०६ अशा विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास एएसआय महादेव नोळे करत आहे. (प्रतिनिधी)
रेतीमाफियाचा तलाठ्यावर हल्ला
By admin | Updated: November 29, 2014 23:28 IST