यवतमाळ : मनं आणि माणसे जोडली गेली. वाद संपून संवाद वाढला. सर्व जाती-धर्माची माणसं एकत्र आली. गावातून व्यसनं हद्दपार झाली. पाहता काय राव जामडोह या गावाने आदर्श गाव होण्याची किमया साधली. या गावाला विकास कधीही शिवला नव्हता. आता मात्र इतर गावांच्या विकासासाठी या गावाचे उदाहरण समोर ठेवले जाते. पांढरकवडा मार्गावर यवतमाळपासून केवळ १० किमी अंतरावर जामडोह हे गाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळ असलेतरी विकासापासून कोसो दूर होते. खानगाव आणि जामडोह मिळून गटग्रामपंचायत तयार झाली आहे. जामडोहकडे मात्र सतत दुर्लक्ष झाले होते. जामडोहला जाण्यासाठी रस्ताही नव्हता. डोंगर खोऱ्यात वास्तव्याचा अनुभव या ठिकाणची मंडळी घेत होती. गावाची निवडणूक झाली आणि महिला सरपंच येताच गावाचा कायापालट झाला. सरपंच लिना संतोष गदई यांनी संपूर्ण गावाला विकासाकरिता एकत्र आणले. पूर्वी गाव आदिवासी, प्रधान आणि सरोदी समाजात विखुरले होते. गट, भांडण, तंटे होत होते. यामुळेच गावाचा विकास होत नसल्याची बाब गावकऱ्यांना पटवून देण्यात आली. तेव्हापासून सर्व प्रश्न एकत्र येऊन सोडविण्याचा निर्णय झाला. आज ग्रामसभेला संपूर्ण गाव एकत्र येते. गाव विकासाचा मॅपही जामडोहने तयार केला आहे. त्या दृष्टीने गाव कामाला लागले आहे. जामडोहमध्ये दारू, सिगारेट, बिडी आणि तंबाखू बंदी आहे. हे व्यसनमुक्त गाव आहे. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी, जोडधंदा म्हणून बहुतांश कुटुंबाकडे दुधाळ जनावरे आहेत. गावातून दररोज गोळा होणारे ३०० लिटर दूध शहराकडे जाते. (शहर वार्ताहर)पाण्यासाठीची दमछाक थांबलीपाण्यासाठीची भटकंती जामडोहवासीयांच्या पाचविलाच पुजलेली. या गावात मुलगी देतांनाही पालक विचारच करीत होते. यावर मात करण्यासाठी बोअर घेण्यात आली. त्याला मुबलक पाणी लागले आहे. यावरून गावाला पाणीपुरवठा होता. यामुळे मैलोंमैल होणारी पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. रस्ता नसल्याने पाचवीनंतर गावाबाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची संख्या कमी होती. रस्ता खडतर असल्याने घरातल्या एका व्यक्तीला रस्त्यापर्यंत सोबत जावे लागत होते. आता रस्ता झाल्याने गावात गाडी पोहोचते. यामुळे सगळेच बिनधास्त झाले आहे. यातून मुलींच्या शिक्षणाचा अडसर दूर झाला आहे.
रावांनी नाही ते गावाने केलं
By admin | Updated: October 20, 2016 01:38 IST