महागाव : महागाव पंचायत समिती कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा जराही वचक प्रशासनावर राहिलेला नाही. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांची वेळेत काम होत नसल्याने नागरिकांतही असंतोष दिसत आहे.महिनाभरापूर्वी नव्याने सभापती, उपसभापती विराजमान झाले आहेत. नव्या सभापती गोदावरी गुलाब जाधव यांना जिल्हा परिषदेचा अनुभव आहे. त्यांचा तो अनुभव पंचायत समिती कार्यालयात उपयोगी पडेल, अशी आशा होती. परंतु त्यांचे वास्तव्य साई येथे आहे. त्यामुळे सामान्य माणसाची भेट होत नाही. अनेक योजना पंचायत समिती कार्यालयामार्फत राबविण्यात येतात. त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पदाधिकारीच उदासीन असल्याचे वास्तव येथे पाहायला मिळत आहे.येथील गटविकास अधिकारी अशोक राऊत यांच्या बदलीनंतर येथील प्रभार महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्याकडे देण्यात आला आहे. बोडरे यांना प्रशासनातील कामाचा अनुभव फारसा नाही. त्यातच प्रभार असल्याने त्यांना नियमित काम सोडून काम करावे लागते. तसेच पंचायत समितीला फारच कमी वेळ देत आहेत. महिला आणि बाल विकास हे महत्त्वाचे काम या कार्यालयाचे आहे. लहान मुलात कुपोषणाचे प्रमाण वाढले असून बहुतांश अंगणवाडी केंद्र अस्वच्छतेने ग्रासले आहे. अंगणवाडी केंद्राचा कारभार ढसाळपणे सुरू आहे. ज्या विभागाचे काम आधीच हाताबाहेर गेले आहे, त्या विभागाचे अधिकारी येथील बीडीओचा प्रभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचे अधिनस्त कर्मचारी कार्यालयापेक्षा हॉटेल, पानटपरीवर अधिक वेळ घालवताना दिसून येतात. सभापती यांचा कोणताही वचक प्रशासनावर राहिलेला नाही. त्यामुळे सामान्य माणसाचे कामे रेंगाळली आहे. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असूनही पक्षाला येथे खूप काही करण्यासारखे असूनही पदाधिकाऱ्यांचे उदासीनतेमुळे सामान्य नागरिकांनासुद्धा जुजबी कारणासाठी पायपीट करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
पंचायत समितीचा कारभार रामभरोसे
By admin | Updated: November 8, 2014 01:51 IST