राळेगाव : एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर एकीकडे उन्हाची तीव्रता उत्तरोत्तर वाढण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर शहरात पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होवू लागल्या आहे. दुसरीकडे शहराला कळमनेरवरून पाणीपुरवठा होणारे पाईप फुटण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे शहराला आठ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता १५ दिवसांपर्यंत होवू लागला आहे. शहरात पाण्यासाठी त्राहीत्राही सुरू झाली असून हाहाकार माजला आहे.कळमनेर-राळेगाव मार्गावर वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम गेली काही महिन्यांपासून सुरू आहे. पाईप टाकणे, जोडणे, खड्डा व नाली सुव्यवस्थित करणे यासाठी जेसीबी मशीनचा वापर होतो. या मशीनच्या कंपनामुळे (व्हायब्रेशन) बाजूलाच असलेल्या जुन्या व आता पाणीपुरवठा सुरू असलेल्या पाईपलाईनला तडे जावून पाईप फुटण्याचे प्रमाण गेल्या दोन आठवड्यात सतत दोन वेळा झाले. त्यापूर्वीसुद्धा असे प्रकार घडलेले आहेत.ग्रामपंचायतीने सूचना दिल्यानंतर कंत्राटदाराने आता पुरेसे अंतर राखून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. पण आता केवळ पाण्याच्या फोर्समुळे जवळपास सरासरी दररोजच कुठेतरी पाईपलाईन फुटत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी याची दखल घेवून फुटलेले पाईप दुरुस्त करतात. एका वॉर्डात पाणी सोडले जात नाही तोच पुन्हा पाईपलाईन फुटल्याची माहिती येते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अडचणी वाढल्या. (तालुका प्रतिनिधी)
राळेगावला महिन्यातून केवळ दोन दिवस पाणी
By admin | Updated: April 27, 2015 02:07 IST