पालकमंत्री : मत्स्य व्यवसायालाही अधिकाऱ्यांनी चालना देण्याचे आवाहन यवतमाळ : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे. पशू विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या व्यवसायाची जोड कशी देता येईल आणि त्या माध्यमातून त्यांच्यात आर्थिक समृद्धी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. विश्रामभवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी पशुधन विकासाचा स्वतंत्र आढावा घेतला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. के. एस. कुमरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. सोनकुसळे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. राजीव बरडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी बदकल, पशुधन अधिकारी डॉ. जी. के. चव्हाण, डॉ. सु. द. इंगळे, डॉ. जे. डी. राऊत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यास शासन अनुकूल आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांशी संबंधित अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे काही वेगळे उपक्रम राबविता येईल. याची शहानिशा करून तसे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना अनुदानावर जनावरांचा पुरवठा केला जातो. परंतु शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम भरावी लागत असल्याने आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी असल्याने यातून शेतकऱ्यांना सूट देता येईल का, या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जनावरांचे अनुदानावर वाटप करताना त्यात सुशिक्षित बेरोजगार, अल्प व अत्यल्प भूधारक यांचाही प्राधान्याने विचार होण्यासाठी वाटपाच्या निकषात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. आपण त्याचा पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. शासनाच्या वतीने केले जाणारे वाटप अतिशय अल्प आहे. विशेष बाब म्हणून जनावरे वाटपांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी वाढवून घेऊ. शासन १४ जिल्ह्यांसाठी पशुधन विकासाचा विशेष कार्यक्रम राबवीत आहे. या कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यांना समान तत्वावर १०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यास यातील जास्तीत जास्त रक्कम उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या वाढीलाही प्रचंड संधी आहे. त्यादृष्टीने सकारात्मक नियोजन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी अमरावती येथील मत्स्यव्यवसायच्या विभागीय अधिकाऱ्यांना यवतमाळ येथे बोलावून त्यांच्याशी विश्रामभवन येथे सविस्तर चर्चा केली. मोर्शीजवळील अप्पर वर्धा धरण येथे सहकारी तत्वावर चांगल्या प्रकारे मत्स्यमारीचे काम होत आहे. त्याच धर्तीवर यवतमाळ येथे चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील होतकरू मत्स्यव्यवसाय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अप्पर वर्धा येथील प्रयोग दाखविण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी मत्स्यव्यवसायच्या प्रादेशिक उपायुक्त ऋतुजा दीक्षित, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मोहन फडतडे, सहायक आयुक्त पसारकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पशुधनाच्या माध्यमातून समृद्धी आणा
By admin | Updated: October 14, 2015 02:57 IST