दारव्हा : मागील वर्षाच्या तुलनेत दारव्हा तालुक्यात रबी पिकांचा पेरा कमी झाला आहे. यंदा पर्जन्यमानसुद्धा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली परिणामामुळे शेतकऱ्यांनी विहिरीतील पातळीचा अंदाज घेवून रबी पिकांच्या पेरणीत कमी क्षेत्र गुंतविले आहे. मागील पंधरवाड्यापासून ढगाळी वातावरण होत असल्याने याचा परिणाम तूर पिकावर जाणवत आहे. बहुतांश शेतकरी तुरीवर किटकनाशकांच्या फवारणीत व्यस्त झाला आहे.यावर्षी पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल कमी होती. सोयाबीन पीक काढणी झाल्याबरोबर चना उत्पादक शेतकरी पेरणी करायचे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे चन्याची उगवण योग्य होते. नंतर दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या तरी पीक हाती येत होते. परंतु यंदा जमिनीत योग्य ओलावा नसल्याने व पाण्याची पातळीही कमी झाल्याने तालुक्यात रबीच्या पेऱ्यात घसरण झाली आहे. मागच्या वर्षी साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात रबी पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी क्षेत्र कमी होवून नोव्हेंबर अखेरचा आठवडा आल्यावरही केवळ साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व चारा पिके पेरली आहेत. अडत्तण नदीवर असलेल्या म्हसणी धरणात सध्या ४१ दलघमी एवढा साठा उपलब्ध आहे. तालुक्यात या अडाण प्रकल्पाचे कालवे आहेत. प्रकल्पापासून ३१ व्या किमीपर्यंत येत असलेल्या शेतकऱ्यांकरिता यावर्षी ओलिताकरिता पाच पाण्याच्या पाळ्यांसाठी पाणी सोडल्या जात आहे. तर ३२ ते ४१ व्या किमीसाठी हरभरा पिकाकरिता तीन पाण्याच्या पाळ्या होईल अशा रितीने पाणी सोडणार असल्याचे अडाण प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले आहे. यासाठी प्रत्येक सातबाराधारकाला एक एकर गहू व एक एकर हरभरा पीक पेरा अशी मर्यादा ठरवून दिलेली आहे. अडाण प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर किमान दोन हजार हेक्अर क्षेत्र ओलित अपेक्षित आहे.विहिरीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकांची पेरणी न करता सध्या शेतात उभ्या असलेल्या कापूस व तूर पिकाला ओलित करून उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ओलितास प्रारंभ केला आहे. त्यात बाजारात तूर डाळीचे भाव वाढल्याने यंदा तूर पिकालाही उत्तम भाव मिळतील या आशेने शेतकरी तूर पिकांची निगा घेताना दृष्टिपथास पडत आहे. सध्या तूर पीक फुलोरा व शेंगांच्या अवस्थेत आहे. ढगाळी वातावरणाने तुरीवर अळ्यांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्यावर योग्य कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)
रबी पिकांचे क्षेत्र घटले
By admin | Updated: November 23, 2015 02:13 IST