शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दिग्रस शहरासह तालुक्यातील हरसूल, कलगाव, इसापूर, वसंतनगर आदी केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागत होते.
शहर व तालुक्यात आता लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पुन्हा गर्दी वाढली आहे. वसंतनगर लसीकरण केंद्रावर, तर भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. कोविडपासून बचावासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर या त्रिसूत्रीला बगल दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कडक उन्हात ज्येष्ठ नागरिक रांगा लावून लसीची प्रतीक्षा करीत आहेत.