पुसद तालुक्यातील पहिला शहीद : १० वर्षांपूर्वी चंपारण्यमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत झाला शहीद अखिलेश अग्रवाल पुसददेशासाठी प्राणाची आहुती देणारा पुसद तालुक्यातील पहिला शहीद शालिग्राम शिवाजीराव जगताप यांच्या स्मृती सदैव तेवत रहाव्या आणि इतरांंना स्फूर्ती मिळावी यासाठी शहीद स्मारक उभारण्यासाठी पुसदमधील समाजसेवी संघटनांसह लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिली होती. परंतु आज दहा वर्ष झाली तरी शहीद शालिग्रामचे स्मारक झालेच नाही. पुसद परिसरात मामा म्हणून परिचित असलेले शिवाजीराव जगताप यांचे ज्येष्ठ सुपूत्र शालिग्राम हा केंद्रीय राखीव पोलीस दलात मेजर होता. हायस्कूलमध्ये शिकत असताना तो एनसीसीमध्ये दाखल झाला होता. देशसेवेसाठी काहीतरी करावे, असे स्वप्न बाळगून शालिग्रामने केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा दिली. त्याने श्रीनगर, अगरतळा, नागपूर अशा ठिकाणी आपली सेवा दिली होती. २००५ मध्ये त्याला बिहारमधील मधुबनी तालुक्यातील चंपारण्य भागात नियुक्त करण्यात आले होते. या भागातील नक्षलवाद्यांनी स्टेट बँक लुटली होती. त्यानंतर त्याच गावातील पेट्रोल पंप जाळला. १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी केंद्रीय राखीव दलाची तुकडी या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोर्चावर गेली. नक्षलवाद्यांशी आठ तास चकमक झाली. त्यात २७ नक्षलवादी मरण पावले. तर तीन जवान शहीद झाले. त्यात पुसदचा शालिग्रामचाही समावेश होता. शालिग्रामच्या छातीत खोलवर गोळी लागली होती. शालिग्रामचा विवाह उमरखेडच्या माधुरीशी झाला होता. निकीता व वैष्णवी ही त्याच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. निकीता ही यवतमाळात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून वैष्णवी ही १२ वीत आहे. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या पुसद तालुक्यातील पहिल्या शहिदाचे स्मारक पुसदमध्ये उभारण्यासाठी त्यावेळी अनेकांनी होकार भरला. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र आता दहा वर्ष झाले तरी शहीद स्मारकाच्या नावाने कुणीही शब्द काढायला तयार नाही.
शहीद शालिग्रामच्या स्मारकाचे पुसदकरांना विस्मरण
By admin | Updated: April 4, 2015 23:59 IST