यवतमाळ : येथील वसंतराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक यंत्र सामग्री खरेदीचे प्रस्ताव मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठविले होते. जानेवारीपासून या प्रस्तावावर कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात रुग्णालयाला एकही यंत्र खरेदी करता आली नाही. मेडिकलसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटी ८५ लाखांचा निधी मिळाला. मात्र अखेरच्या टप्प्यात या खरेदीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने निविदा प्रक्रिया मार्च अखेरपूर्वी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. नाईलाजाने चार कोटी ८५ लाखांचा निधी नियोजन समितीकडे परत करावा लागला. याहीपेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे जानेवारी महिन्यात रुग्णालय प्रशासनाने १०० एमएमच्या तीन एक्सरे मशीन, मच्युरी कुलर कॅबीनेट, थ्री पार्ट सीबीसी सेल काऊंटर, बॅरीअॅक्टीक सर्जरी आॅपरेशन टेबल, ब्लड गॅस अॅनालायझर इत्यादी मशीन व साहित्य खरेदीचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात डीएमईआरकडे पाठविला होता. तब्बल ५० लाखांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी हे प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र यावर डीएमईआरकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. साहित्य खरेदीसंदर्भात आलेले प्रस्ताव रुग्णालय प्रशासन डीएमईआरच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविते. यावर्षीचे प्रस्ताव डीएमईआरस्तरावरच प्रलंबित राहिल्याने नवीन शासनाच्या काळात एकही साहित्य खरेदी झालेली नाही. वरिल सर्व साहित्य रुग्णालयात नसल्याच्या त्रृट्या एमसीआयच्या (भारतीय आयुर्विज्ञान परिषद) पथकाने काढल्या आहेत. त्या दूर झाल्या तरच एमबीबीएस प्रथम वर्षाच्या ५० जागांची मान्यता कायम राहणार आहे. याशिवाय रुग्णसेवेतही अत्याधुनिक साधन सामग्री असल्यास त्याचा फायदा होता. रुग्णांवर नवीन तंत्राज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून त्यांना लवकरात लवकर बरे करता येते. मात्र प्रशासकीय दफ्तरदिरंगाईमुळेच मेडिकलमधील साहित्य खरेदी रखडलेली असून त्याचा फटका रुग्णांना बसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
‘मेडिकल’चे यंत्र खरेदी प्रस्ताव रखडले
By admin | Updated: April 19, 2015 02:08 IST