महागाव : सदोष दोषारोपपत्र दाखल केल्याने शिक्षेचे प्रमाण घटल्याचे महागाव पोलीस ठाण्याच्या बाबत तरी दिसून येत आहे. अलीकडे न्यायालयाने दिलेल्या तीन निकालात गंभीर गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटले आहे. महागाव तालुक्यात खून, अत्याचार, सदोष मनुष्यबळ यासह विविध घटना घडल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करून प्रकरणे न्यायप्रविष्ठ केली. मात्र न्यायालयात लागलेल्या निकालावरून पोलिसांच्या दोषारोपपत्रावरच संशय येत आहे. माळकिन्ही, कोठारी, पोखरी येथे गत चार-पाच वर्षात शेतीच्या वादातून खून झाले. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. परंतु सबळ पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात महागाव पोलीस अपयशी ठरले. महागाव पोलिसांनी तपास केलेली २१ प्रकरणे न्यायालयात सुनावणीसाठी आलेले आहेत. त्यापैकी कोठारी, माळकिन्ही आणि पोखरी येथील खुनाचे प्रकरणे निकाली निघाले आहे. तपासात कच्चे दुवे, साक्षीदार फितूर होणे, घटनास्थळाचा सदोष पंचनामा आदी बाबींवरून तपासात हयगय केल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)
सदोष चार्जशिटने शिक्षेचे प्रमाण घटले
By admin | Updated: May 25, 2015 02:23 IST