एक ताब्यात : पुण्याच्या तिघांचा शोध, पोलिसांनी केले स्केच जारीपुसद : येथील बांधकाम व्यावसायिक जयंत चिद्दरवार यांच्याकडे वर्षभरापूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाचा मास्टर मार्इंड संजय उर्फ पंडीत मिश्राच असल्याचे उघडकीस आले असून, एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील अन्य तिघे जण पुण्याचे असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांचे स्केच जारी करून पोलिसांनी शोध जारी केला आहे. येथील रामनगर भागातील बांधकाम व्यावसायिक जयंत चिद्दरवार यांच्या घरी २९ मे २०१५ रोजी दरोडा पडला होता. चार दरोडेखोरांनी चिद्दरवार दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून आठ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. परंतु हाती काहीच लागत नव्हते. नव्याने रुजू झालेले ठाणेदार गजानन शेळके यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी रमेश रंगराव कदम याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन विचारपूस केली, तेव्हा सदर गुन्ह्याचा मास्टर मार्इंड संजय उर्फ पंडित मिश्रा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मेव्हूना राजू पांडे व तीन अज्ञात तरुणाकडून सदर गुन्हा घडवून आणल्याचे पुढे आले. सदर तीन अज्ञात इसम पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. रमेश कदम रा. पुसद याने दिलेल्या माहितीवरून तीन अज्ञात इसम व राजू पांडे यांचे स्केच जारी करण्यात आले आहे. स्केचमध्ये नमूद इसम आढळून आल्यास पुसद शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार गजानन शेळके यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके, प्रकाश आडे, राहुल कदम करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसद दरोड्याचा मास्टर मार्इंड पंडित मिश्राच
By admin | Updated: July 4, 2016 02:05 IST