मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार : बाभूळगाव नगरपंचायतीतर्फे पाच हजारांचे अनुदान लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घेतला असून मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात पथनाट्यातून शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले जात आहे.बाभूळगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी संपूर्ण बाभूळगाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून मिळणाऱ्या १२ हजार रुपयांव्यतिरिक्त बाभूळगाव नगरपंचायतीने पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांना १७ हजार रुपये मिळणार आहे. ३९८ लाभार्थ्यांना सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असून २५२ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नागरिकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरातील शिवाजी चौक, इंदिरा चौक, इंदिरानगर, नेहरूनगर येथे पथनाट्य सादर करण्यात आले. शिवाय शहरात ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले. शौचालय बांधण्यासाठी नगरपंचायतीकडे अर्ज सादर करण्याची विनंती केली जात आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकात गौरव गोटफोडे, गजानन गोडफोडे, पुरुषोत्तम कन्नाके, हिरामण टेकाम, सुधाकर पाल, अशोक रामेकर आदींची नियुक्ती केली असून पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. पहाटे पथक उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना समज देवून शौचालयाचे महत्त्व सांगत आहे. बाभूळगाव शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुलाबपुष्पाने स्वागतउघड्यावर शौचास बसणाऱ्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली. तसेच समज देवून सोडलेला पुन्हा उघड्यावर शौचास गेल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपंचायतीने शौचालय बांधकामाची धडक मोहीम हाती घेतली असून अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी विशेष लक्ष देत आहेत.
शौचालयासाठी पथनाट्यातून जनजागृती
By admin | Updated: June 13, 2017 01:20 IST