आणखी चौघांचा समावेश : यवतमाळ पं.स.तील रोहयो अपहारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रोजगार हमी योजनेतील साडेसहा कोटींच्या अपहारात येथील पंचायत समिती बीडीओंसह पाच जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.यवतमाळ पंचायत समितीत कार्यरत गटविकास अधिकारी सुभाष मानकर, सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रशेखर राऊत, कनिष्ठ लेखा अधिकारी सचिन चिकटे यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा २००५ मधील तरतुदीनुसार निलंबनाची कारवाई करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांना दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने पंचायत समितीत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत सहा कोटी ५४ लाखांचा अपहार झाल्याचा अहवाल दिला होता. त्यात बीडीओ सुभाष मानकर यांच्यासह तत्कालीन दोन बीडीओंवर ठपका ठेवला. २०१५-०१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही अनियमितता झाल्याचे अहवालात नमूद आहे. हा अहवाल तब्बल दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाला सादर झाला. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर अखेर निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
बीडीओंच्या निलंबनाचा प्रस्ताव
By admin | Updated: July 14, 2017 01:42 IST