डिसेंबरमध्ये संपणार मुदत : शहराची लोकसंख्या आता अडीच लाख सुरेंद्र राऊत यवतमाळ नगरपरिषद हद्दवाढीनंतर जिल्हा निवडणूक विभागाने विभागीय आयुक्ताकडे यवतमाळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. यात पालिकेची सदस्य संख्या निश्चितीचाही अहवाल असून ५७ सदस्य संख्या राहणार आहे. नगरपरिषदेची सध्याची सदस्य संख्या ४१ आहे. हद्दवाढीनंतर शहराची लोकसंख्या दुप्पटीने वाढली आहे. २ लाख ५१ हजार २७ लोकसंख्येसाठी नगरपरिषदेला काम करावे लागणार आहे. वाढीव क्षेत्रापुरतीच निवडणूक घेणे शक्य नाही. नगरपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे हा गुंता सोडविण्यासाठी प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. नगरप्रशासन विभागाने विभागीय आयुक्ताकडे पालिकेतील सदस्य संख्या आणि हद्दवाढीनंतरची सदस्य संख्या निश्चितीचा अहवाल दिला आहे. यामध्ये सार्वत्रिक निवडणूक झाल्यास ५७ सदस्यासाठी घेण्याचे नमूद केले आहे. वाढीव क्षेत्रानंतर शहरात अनुसूचित जातीची लोकसंख्या ३८ हजार ५७८ तर अनूसुचित जमातीची लोकसंख्या २० हजार ३०१ इतकी आहे. यानुसार आरक्षणावर परिणाम होणार आहे. मुदतपूर्व निवडणूक घेऊन वाढीव क्षेत्राला हक्काचे नगरसेवक मिळवून द्यावेत, अशी मागणी आहे. आठ नगर परिषदांसाठी १६ फेब्रुवारीला बैठक जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची डिसेंबर महिन्यात मुदत संपणार आहे. यात यवतमाळ, वणी, पुुसद, घाटंजी, आर्णी, उमरखेड, दारव्हा, दिग्रसचा समावेश आहे. त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी १६ फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे महत्वाचे ठरणार आहे. उर्वरित सात नगरपरिषदेत वेळेवरच मतदान प्रक्रिया होणार आहे.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रस्ताव
By admin | Updated: February 13, 2016 02:08 IST