दारव्हा : शहरातील बचत भवन व त्यामधील बॅटमिंटन कोर्टची दुरूस्ती तसेच काही नवीन कामासाठी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. शहरातील क्रीडांगणांची अवस्था वाईट झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. त्याचप्रमाणे बॅटमिंटन असोसिएशनने कोर्ट दुरूस्तीची मागणी केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले होते. याठिकाणी शिवाजी स्टेडीयम आणि इनडोअर खेळाककरिता बचत भवन असे दोनच पर्याय उपलब्ध आहे. सध्या या दोन्ही मैदानांची वाईट अवस्था झाली आहे. स्थानिक बचत भवनात शासनाने लाखो रुपये खर्च करून बॅटमिंटन कोर्ट तयार केले. त्यावर वेळच्यावेळी मेन्टनन्स होत नसल्याने बिकट अवस्था झाली आहे. पुरेशा प्रकाशाकरिता योग्य व्यवस्था नाही. बचत भवनाचा शासकीय बैठका व इतरही कामांसाठी वापर होतो. जेवणाचेही कार्यक्रम होतात. त्यामुळे कोर्टची अवस्था वाईट झाली आहे. अलिकडे या हॉलचा गैरवापर वाढला होता. या संदर्भात बॅटमिंटन असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन दुरूस्तीची मागणी केली होती. हॉलसह शिवाजी स्टेडीयमवर पुरेशा सुविधा नसल्याचा विषय ‘लोकमत’ने लावून धरला होता. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी दुरूस्तीच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या कामासाठी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामध्ये बॅटमिंटन कोर्टचे दुरूस्ती, प्रकाश व्यवस्था अंतर्गत सजावट, साऊंट सिस्टिम आणि व्यासपीठाच्या बाजुला खोली बांधकाम, विश्रामासाठी खोली, प्रसाधनगृहाचे बांधकाम याबाबी समाविष्ट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तो मंजूरीकरिता जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. बचत भवनच्या दुरूस्ती व नवीन कामानंतर बॅटमिंटन खेळासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
बचत भवन दुरूस्तीसाठी २५ लाखांचा प्रस्ताव
By admin | Updated: October 12, 2015 02:38 IST