उमरखेड : विकलांगांच्या राष्ट्रीय स्पर्धेत देशातून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या पूनम इटकरे हिचा मार्लेगाव या तिच्या मूळ गावात सत्कार करण्यात आला. आमदार राजेंद्र नजरधने, अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दृष्टीहीन पूनम इटकरे हिने राष्ट्रीयस्तरावर तालुक्याची मान उंचावली. ३० डिसेंबरला ती मार्लेगावात परतली. शनिवारी सकाळी १० वाजता गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात तिचा सत्कार आयोजित केला. आमदार राजेंद्र नजरधने, शेतकरी ग्रामीण विकास मंडळाच्या अध्यक्ष सुषमा जाधव, राम देवसरकर, सतीश वानखेडे, अॅड.माधव माने यांच्या हस्ते पूनम व तिची आई निर्मला तसेच वडील भीमराव यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आमदार नजरधने व देवसरकर यांनी आपल्या भाषणातून पूनमचे कौतुक केले. कार्यक्रमाला रमेश चव्हाण, सुनील टाक, आदेश जैन, सुदर्शन कदम, प्रकाश दुधेवार, गुलाबराव सूर्यवंशी, तहसीलदार भगवान कांबळे, माया पाटील, नारायण नरवाडे, नारायण इटकरे, दत्ता गंगासागर, कैलास राठोड, रवी कदम उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच कैलास शिंदे तर सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले. गावातील लेकीने मिळविलेल्या या यशामुळे उपस्थित गावकरी भावनाविवश झाले होते. मी अंध असली तरी माझ्या आई-वडिलांनी रोजमजुरी करत मला शिकवले, अशी भावना यावेळी पूनमने व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी) लवकरच शासनातर्फे सत्कार यावेळी आमदार राजेंद्र नजरधने म्हणाले की, पूनम इटकरे हिच्या पुढील शिक्षणासाठी व इटकरे परिवारासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच महाराष्ट्र शासनाकडून पूनमचा मुंबईत सत्कार केला जाणार आहे. शेतकरी ग्रामीण विकास मंडळाच्या अध्यक्ष सुषमा जाधव यांनीही मदत म्हणून पूनमला ११ हजारांचा धनादेश यावेळी दिला.
अपंगांची राष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या पूनमचा मार्लेगावात सत्कार
By admin | Updated: January 1, 2017 02:25 IST