उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील सिंचन तलावात मुबलक पाणी असताना नादुरुस्त कालव्यांमुळे रबीचे सिंचन धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी कालव्यांमध्ये झुडूपे वाढले असून अनेक कालवे गाळाने भरले आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. रबीवर असलेली आशाही आता मावळत आहे. सिंचन तलावात मुबलक पाणी दिसत असले तरी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्याची कोणतीच व्यवस्था नाही. तालुक्यातील धनज, तरोडा, पोफाळी, मरसूळ, अंबोना, पिरंजी, दराटी, निंगनूर या तलावामध्ये पाणी आहे. परंतु या तलावाचे कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. मुख्य कालव्यासह वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडूपे वाढलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. काही ठिकाणी तर असलेले गेटही नष्ट झाले आहे. तडे गेलेल्या वितरिकेतून पाणी पाझरते त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग मात्र दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना उमरखेड तालुक्यात तरी दिसत नाही. वितरिका नादुरुस्त असून या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु रबी हंगाम तोंडावर आला तर अद्याप पाटबंधारे विभागाने लक्ष दिले नाही. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. आता पंचायत समितीचे माजी उपसभापती शामराव पाटील सुरोशे यांनी सहायक अभियंतांना निवेदन दिले आहे. वितरिकेतून पाणी तोडले नाही तर १५ नोव्हेंबरपर्यंत आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. (वार्ताहर)
तलावात पुरेसे पाणी, कालवे मात्र नादुरुस्त
By admin | Updated: November 9, 2014 22:36 IST