जिल्हा परिषद, पंचायत समिती गण-गटात बदल : दिग्गजांना शोधावा लागणार दुसरा मतदार संघवणी : बुधवारी वणी येथे वणी तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणांची तर यवतमाळ येथे जिल्हा परिषदेच्या वणी तालुक्यातील चार गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीने वणी तालुक्यातील निवडणुकीच्या राजकारणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. संभाव्य राजकीय उलथापालथीमुळे काही दिग्गजांना आपला हक्काचा मतदार संघ सोडून दुसऱ्या मतदार संघात आपले राजकीय भवितव्य शोधावे लागणार आहे, तर या आरक्षण बदलामुळे काही सर्वसामान्य इच्छूक कार्यकर्त्यांसाठी राजकीय संधीचे दार उघडले जाणार आहे.वणी तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आहेत. नव्याने परिसिमांकन झालेल्या लालगुडा-लाठी या गटाचे आरक्षण अनुसुचित जमाती सर्वसाधारण, घोन्सा-कायर-सर्वसाधारण, शिरपूर-शिंदोला-अनुसुचित जमाती सर्वसाधारण तर चिखलगाव-राजूर-अनुसुचित जाती सर्वसाधारण असे निघाले आहे. पंचायत समितीच्या लालगुडा या नव्याने निर्माण झालेल्या गणाचे अनुसुचित जाती (महिला) आणि लाठी या गणाचे सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे. चिखलगाव गणाचे नामाप्र, राजूर-अनुसुचित जमाती (महिला), घोन्सा-सर्वसाधारण, कायर-महिला (सर्वसाधारण), शिरपूर-महिला(नामाप्र) आणि शिंदोला या गणाचे सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत निघाली आहे. सन २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेऊन वणी तालुक्याच्या जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणांचे नव्याने परिसिमांकन करण्यात आले आहे. या परिसिमांकनात सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुळच्या कायर-शिरपूर गटात तसेच भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मूळ लाठी-शिंदोला या गटात परिसिमांकनामुळे बदल झाला. त्यामुळे त्यामुळे अगोदरच इच्छूक कार्यकर्त्यांचे राजकीय गणित बदलले होते. आता त्यात आरक्षण सोडतीत अधिकची भर टाकली आहे. भाजपाचे खंदे कार्यकर्ते विजय पिदूरकर यांचा गड मानल्या गेलेल्या आताचा नवीन शिरपूर-शिंदोला हा जिल्हा परिषद गट अनुसुचित जमाती (सर्वसाधारण) असा झाल्यामुळे विजय पिदूरकरांना आता लवकरच नव्याने मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे. कायर-घोन्सा या नव्याने परिसिमांकन झालेल्या जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्यामुळे या जिल्हा परिषद गटातील सर्वच प्रस्थापित राजकीय कार्यकर्त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. वणीच्या राजकारणात नेहमीच शिवसेनेच्या बाजुने राहिलेला हा गड आता खुला झाल्यामुळे शिवसेनेसह इतरही राजकीय पक्षांमध्ये या गटातून उभे राहण्याची इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे या गटातील उमेदवारी देताना राजकीय पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. चिखलगाव-राजुर हा जिल्हा परिषदेचा गट अनुसुचित जाती (सर्वसाधारण) असा झाल्यामुळे या गटाचे प्रतिनिधीत्व करणारे विद्यमान जि. प. सदस्य शरद चिकाटे यांना शिवसेना पुन्हा नव्याने संधी देते काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हक्काचा मतदार संघ गेल्यामुळे विजय पिदूरकार यांच्याकडून घोन्सा-कायर गटातून उमेदवारी मागितली जाण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आरक्षण सोडतीने राजकीय उलथापालथ
By admin | Updated: October 6, 2016 00:26 IST