महिलेचा विनयभंग : पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ, उशिरा रात्री गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्ककळंब : दारूच्या नशेत तर्रर पोलीस शिपायाने घरात शिरुन महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या महिलेने पोलीस शिपायाची चपलेने धुलाई केली. ही घटना येथील माथा परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान कळंब पोलिसांनी या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.देवानंद वाघाडे (४०) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. बुधवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान देवानंद दारूच्या नशेत माथा वस्ती परिसरात गेला. तेथे एका महिलेच्या घरात शिरला. त्यावेळी सदर महिलेचा पती बाहेरगावी गेला होता. दारूच्या नशेत तर्र्रर देवानंदने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करू लागला. यामुळे घरातील दोन लहान मुले घाबरुन गेली. सदर महिलेने त्याला विरोध करीत आपल्या पतीला महिती दिली. तो तत्काळ घरी आला. त्यानंतर देवानंदला सदर महिलेने रागाच्या भरात चपलेने मारहाण केली. पोलिसाला होणारी मारहाण पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली. सदर घटनेची तक्रार देण्यासाठी महिला रात्रीच पोलीस ठाण्यात धडकली. परंतु पोलिसांनी तब्बल दोन तास तिची तक्रार घेतली नाही, असा आरोप आहे. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सदर महिला ठाम राहिली. रात्री १ वाजताच्या सुमारास तक्रार घेऊन देवानंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत करीत आहे. याबाबत ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांना विचारले असता, देवानंद वाघाडे याला अनेकदा समज देण्यात आली. यापूर्वीच्या अनेक प्रकाराची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्याची बदली येथून करण्यात आली आहे. घटनेच्या एक दिवसापूर्वीपर्यंत तो ठाण्यात कार्यरत होता. नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे ठाणेदार कुऱ्हाळे यांनी सांगितले.
कळंबच्या पोलिसाची चपलेने धुलाई
By admin | Updated: June 9, 2017 01:39 IST